७ ते १४ डिसेंबर या कालावधीत श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्रीमती भागीरथी (माई) मारुति जांभळे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे’च्या वतीने जयसिंगपूर येथे ७ ते १४ डिसेंबर या कालावधीत ४५ व्या श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने ११ व्या गल्लीतील श्री दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रतिदिन नैमित्तिक कार्यक्रमांसमवेत दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत भक्तीगीते, भजन आणि नामस्मरण होईल. ७ ते १३ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ वाजता ‘गुरुचरित्र’ वाचन होईल. १५ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता श्रीमती सुनंदा कुलकर्णी यांचे श्री दत्त जन्मावर कीर्तन, दुपारी १२.१५ वाजता ‘श्रीं’चा जन्मकाळ आणि दुपारी १ वाजता महाप्रसाद होईल. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भगवंतराव जाभंळे यांनी केले आहे.
१० डिसेंबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांचे ‘मानवी जीवनात साधना आणि दत्तोपासना यांचे अनन्यसाधारण महत्त्व’, या विषयावर अनमोल मार्गदर्शन होईल, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भगवंतराव जांभळे यांनी केले आहे. |
मंदिराची माहिती !
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, ११ व्या गल्लीतील श्री दत्त मंदिर हे भगवंतराव जांभळे यांच्या खासगी मालकीचे आहे. श्री. भगवंतराव जांभळे हे त्यांच्या आत्याला दत्तक गेले आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव दळवी होते. दत्तक विधीनंतर ते जांभळे झाले. त्यांना एक भाऊ आहे. त्यांच्या वडिलांना २ मुले. श्रीमती भागीरथी (माई) मारुति जांभळे (दळवी ) यांनी त्यांच्या मूळगावी अर्थात् नृसिंहवाडी येथे दोन तपे दत्त महाराजांची सेवा केली. कालांतराने जयसिंगपूर येथे वास्तव्याला आल्यानंतरसुद्धा नित्यनियमाने नृसिंहवाडीस सेवेसाठी जात. यानंतर एके दिवशी त्यांना साक्षात् दत्तगुरूंनी स्वप्न दृष्टांताद्वारे सांगितले, ‘आता तुला माझ्या सेवेसाठी वाडीला येण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः तिथे येतो’, असे सांगून ज्वलंत निखारा दाखवून ‘हे माझे ठिकाण’, असे सांगून श्री दत्तगुरु अंतर्धान पावले. तद़्नंतर अकराव्या गल्लीत हे मंदिर ५ नोव्हेंबर १९८० या दिवशी श्रीमती भागीरथी यांनी पुढाकार घेऊन बांधले.
सध्या या मंदिराचे व्यवस्थापन माईंचे दत्तकपुत्र श्री. भगवंतराव जांभळे अविरतपणे सांभाळत आहेत. मंदिराचा नित्योपचार सकाळी ६.३० वाजता काकड आरतीने प्रारंभ होऊन नित्य पूजा, धूप आरती त्यानंतर दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य आणि रात्री ८ वाजता धूप-आरती, नित्य पाठ होऊन शेजारतीने रात्री ९ वाजता मंदिर बंद करण्यात येते. या मंदिरात अनेक भाविकांना अनुभूती येतात.