अखिल भारतीय हिंदु सेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीळ (गुरु) यांचे निधन !
अकोला (वार्ता.) – येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ असलेले, संपूर्ण विदर्भात ‘गुरु’ म्हणून लोकप्रिय असलेले, अखिल भारतीय हिंदु सेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीळ (वय ८९ वर्षे) यांचे १ डिसेंबर या दिवशी सकाळी निधन झाले. गेल्या पिढीतील अनेकांचा आदर्श असलेल्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरभक्त असलेल्या या हिंदुत्वनिष्ठाने प्रचंड कार्य केले. नियतकालिक, कमांडो केंद्र, अखिल भारतीय हिंदु सेना, व्यायामशाळा आणि हिंदू ज्ञानपीठ शाळा ही त्यातील काही उदाहरणे आहेत.
गणेशोत्सव मिरवणुकीत सशस्त्र चालत असलेले गुरु गाडगीळ आणि त्यांच्या व्यायामशाळेतील युवकांची विविध प्रात्यक्षिके उपस्थितांना थक्क करत. त्यांचे हे शौर्य जागरणाचे उपक्रम केवळ प्रात्यक्षिकांपुरते मर्यादित नव्हते, तर अकोला येथील हिंदु-मुसलमान दंगलप्रसंगी तलवारी घेऊन रस्त्यावर उतरण्यासही ते कचरत नव्हते. त्यामुळे शहरात त्यांचा दरारा होता.
अकोला येथे सनातन संस्थेचे कार्य चालू झाले, तेव्हा संस्थेच्या साधकांनी त्यांची भेट घेऊन त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली होती. तेव्हा त्यांनी कार्याला शुभेच्छा दिल्या होत्या. अशा या प्रखर हिंदुत्वनिष्ठाच्या निधनामुळे संपूर्ण अकोला शहर आणि विदर्भ शोकाकुल झाला. अनेक महनीय व्यक्तींनी त्यांच्याप्रतीच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
‘एक निष्ठावान आणि प्रयत्नवादी आदर्श हरपला. त्यांना श्रद्धांजली ! श्रीराम !’ अशा शब्दांत प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी त्यांच्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.