‘टक्केवारी’ची कीड !
सध्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. ‘भ्रष्टाचार करणे चुकीचे आहे’, असे कुणालाच वाटत नाही. भ्रष्ट व्यवस्थेची ही पाळेमुळे केवळ शासकीय कार्यालयांपुरती मर्यादित राहिलेली नसून ती खासगी संस्थांमध्येही पाय रोवत आहे. कुठल्याही सरकारी कामाचा करार मिळवायचा असेल, तर त्याचे कमिशन (दलाली स्वरूपात पैसे) द्यावे लागते. त्याची साखळीही ठरलेली असते. केवळ त्याची पद्धत वेगळी असते. एखाद्या कामाचा करार कुणाला द्यावा ? त्याची किंमत किती ठरवायची ?, हे सर्व वरिष्ठांच्या मर्जीने एक विभाग करत असतो. समोरच्या आस्थापनाला जर तांत्रिकदृष्ट्या हरवता आले नाही, तर ते कामाची किंमत खाली उतरवतात. त्यामुळे स्पर्धेमधील आस्थापन त्या शर्यतीमधून आपोआप बाहेर पडते. शेवटी काय, त्यांच्या मर्जीमधील आस्थापनाला त्यांना काम देता येते आणि स्वतःची टक्केवारी ठरवून घेता येते. एखाद्या आस्थापनामधून स्वतःच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील किंवा स्वतःच्या वेतनात वृद्धी करायची असेल, तर योग्य त्या व्यवस्थापनेच्या मार्गाने किंवा तांत्रिक मार्गाने न जाता कामगार संघटना राजकीय नेत्यांच्या माध्यमातून स्वतःच्या वेतनाची टक्केवारी वाढवून घेतात. त्याचीही साखळी ठरलेली असते. काही काम मिळवायचे असेल, तर ‘कौशल्य’ किंवा ‘गुणवत्ता’ हा दुय्यम भाग येतो. कामाची टक्केवारी हा भाग प्रथम येतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
भारताच्या दृष्टीने विचार केल्यास विकसनशील भारत आता विकसिततेकडे वाटचाल करत आहे. अनेक उत्पादनांच्या क्षेत्रात प्रगतीपथावर जात आहे. ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत अनेक लहान-मोठ्या उद्योगधंद्यांना प्रारंभ होत आहे; पण असे असतांनाच ही भ्रष्टाचाराची ‘टक्केवारी’ सर्वांनाच मागे खेचत आहे किंवा संबंधित व्यवस्थेला पोखरून टाकत आहे. त्यामुळे उद्योगधंदे अल्पावधीतच बंदही पडत आहेत. त्यातून कधीही भरून न येणारी हानी होत आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेली नीतीमत्ताहीन यंत्रणा सर्वत्र कार्यरत असल्याने नव्या उद्योगधंद्यांना चालना कशी मिळणार ? प्रगतीशील होऊ पहाणार्या भारताला लागलेली ही एक प्रकारे खीळच आहे.
‘टक्केवारी’च्या यंत्रणेवर उपाय, म्हणजे ‘नीतीमान’ आणि ‘समाजभान’ जपणारी राष्ट्रप्रेमी पिढी निर्माण करायला हवी. त्यासाठी सुसंस्कारांची आवश्यकता आहे आणि ते सरकारसह आपणच करायला हवेत. सुसंस्कारांच्या पायावर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीची इमारत कधीच उभी रहाणार नाही, उलट त्यात गुणवत्ता आणि कौशल्य यांची कसोटी निर्माण होईल. तीच भारताला विकसित करील, हेच खरे !
– श्री. जयेश बोरसे, पुणे