Bill Gates Controversy : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी भारताला ‘प्रयोगशाळा’ संबोधले !
लोकांकडून संताप व्यक्त
नवी देहली – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स एका नव्या वादात अडकले आहेत. ‘लिंक्डइन’चे सहसंस्थापक रीड हॉफमन यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारताचे वर्णन ‘प्रयोगशाळा’ असे केले. बिल गेट्सचा यांचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला. भारताला ‘प्रयोगशाळा’ संबोधल्याविषयी लोकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
१. बिल गेट्स म्हणाले की, ज्या देशांमध्ये अनेक समस्या आहेत, अशा देशांसाठी भारत एक उदाहरण आहे; परंतु असे असूनही तो देश आरोग्य, पोषण आणि शिक्षण क्षेत्रांत प्रगती करत आहे. या समस्या असूनही भारतातील सरकारला भरपूर महसूल मिळत आहे. भारत एका प्रयोगशाळेसारखा आहे, जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रयोगांवर काम करू शकता आणि जेव्हा हे प्रयोग यशस्वी होतात, तेव्हा त्याचा वापर जगाच्या इतर भागांतही केला जाऊ शकतो.
२. बिल गेट्स यांच्या विधानानंतर वर्ष २००९ मध्ये ‘बिल गेट्स फाऊंडेशन’ने भारतात केलेल्या लसीच्या चाचण्यांविषयही चर्चा चालू झाली आहे.
३. वर्ष २००९ मध्ये ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आय.सी.एम्.आर.च्या) सहकार्याने ‘पाथ’ या स्वयंसेवी संस्थेने गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीची भारतात चाचणी केली होती. ‘पाथ’ला गेट्स फाऊंडेशनकडून निधी मिळाला होता.
४. या चाचणीच्या वेळी तेलंगाणा आणि गुजरात येथील सुमारे १४ सहस्र आदिवासी शाळकरी मुलींचे लसीकरण करण्यात आले; परंतु लस दिल्यानंतर काही महिन्यांनी विद्यार्थिनींमध्ये त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले होते आणि ७ जणांचा मृत्यूही झाला होता.
संपादकीय भूमिकाप्रयोगशाळेत जसे काही प्रयोग यशस्वी होतात, तर काही फसतात. तसेच पाश्चात्त्य देश आणि तेथील आस्थापने त्यांच्या नवीन उत्पादनांच्या चाचणीसाठी भारतियांवर वापर करून त्यांचा जीव धोक्यात घालतात. गेट्स यांच्या या वक्तव्यावरून पाश्चात्त्यांची हीन मनोवृत्ती यातून दिसून येते. ही मनोवृत्ती नष्ट करण्यासाठी भारताने सर्वच क्षेत्रांत सक्षम होऊन महासत्ता होणे आवश्यक ! |