बांगलादेश सरकारने भारतीय उच्चायुक्तांना समन्स पाठवून जाब विचारला !
आगरतळा (त्रिपुरा) येथील बांगलादेशाच्या उच्चायोग कार्यालयावर आक्रमण
भारतात स्वतःच्या कार्यालयावर आक्रमण झाल्यावर तत्परतेने जागा होणारा बांगलादेश हिंदूंवर त्यांच्या देशात होत असलेली आक्रमणे त्याला दिसत नाही !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने येथील भारतीय उच्चायुक्त प्रणयकुमार वर्मा यांना समन्स बजावले आहे. त्रिपुराच्या आगरतळा येथील बांगलादेशाच्या सहाय्यक उच्चायोग कार्यालयावर १ डिसेंबरला झालेल्या आक्रमणावरून हे समन्स बजावण्यात आले. यानंतर कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी वर्मा ३ डिसेंबरला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास परराष्ट्र मंत्रालयात पोचले.
भारताने केला होता निषेध !
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला होता. ‘कोणत्याही परिस्थितीत राजनैतिक आणि दूतावासातील मालमत्तांना लक्ष्य केले जाऊ नये’, असे म्हटले होते. तसेच नवी देहलीतील बांगलादेश उच्चायोग आणि देशातील त्यांच्या उप/सहाय्यक उच्चायुक्त यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यासाठी आदेश देण्यात आले.
काय होती घटना ?
आगरतळा येथील बांगलादेश साहाय्यक उच्चायोगाच्या कार्यालयासमोर चिन्मय प्रभु यांच्या अटकेच्या प्रकरणी जमावाने निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयावर आक्रमण करत तोडफोड करण्यात आली. तसेच बांगलादेशाचा राष्ट्रध्वज काढून टाकण्यात आला. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून ३ पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.