पांडुरंगाच्‍या पालखीचे हरिनामाच्‍या गजरात स्‍वागत !

‘श्रीं’चा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्‍थ !

आळंदी (जिल्‍हा पुणे) – श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगाच्‍या पालखी सोहळ्‍याचे परतीच्‍या प्रवासात वडमुखवाडीतील ‘श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज थोरल्‍या पादुका मंदिर ट्रस्‍ट’या वतीने मंदिरात रांगोळीच्‍या पायघड्या, पुष्‍पसजावटीसह जल्लोषात स्‍वागत करण्‍यात आले. ‘श्री संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज थोरल्‍या पादुका मंदिर ट्रस्‍ट’चे संस्‍थापक अध्‍यक्ष विष्‍णु तापकीर यांनी पालखी सोहळ्‍याचे परंपरेने स्‍वागत केले.

याप्रसंगी ‘श्री पांडुरंगराय पालखी सोहळा’ प्रमुख अधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ‘श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समिती’चे विश्‍वस्‍त ह.भ.प. माऊली महाराज जळगावकर देशमुख, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा मालक ह.भ.प. बाळासाहेब आरफळकर, ऋषिआबा महाराज वासकर आदी मान्‍यवरांचे शाल, श्रीफळ, उपरणे देऊन ‘श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज थोरल्‍या पादुका मंदिरा’चे संस्‍थापक अध्‍यक्ष अधिवक्‍ता विष्‍णु तापकीर यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. पांडुरंगाच्‍या पालखी सोहळ्‍यातील वैभवी पादुकांची पूजा करून मार्गस्‍थ पादुकांना पुष्‍पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्‍यात आले. ‘श्रीं’ची आरती हरिनाम गजरात झाली. ‘श्रीं’ना महानैवेद्य वाढण्‍यात आला. भाविक राजेंद्र नाणेकर यांच्‍या वतीने मंदिरास लक्षवेधी पुष्‍पसजावट सेवा रुजू करण्‍यात आली.