जेजुरी गडावर (पुणे) करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या शुभहस्ते घटस्थापना !
घटस्थापना करून ‘चंपाषष्ठी उत्सवा’ला प्रारंभ !
जेजुरी (जिल्हा पुणे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर वेदमंत्रांच्या घोषात ‘करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती’ यांच्या शुभहस्ते घटस्थापना करून ‘चंपाषष्ठी उत्सवा’ला प्रारंभ करण्यात आला. मुख्य मंदिरातील उत्सवमूर्तींची पाकाळणी (प्रक्षालन), पूजा आणि अभिषेक झाल्यानंतर ११ वाजता उत्सवमूर्ती सनई-चौघड्यांच्या निनादामध्ये ‘नवरात्र महाला’मध्ये आणून खंडोबा-म्हाळसा देवीच्या मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी आणि मंगेश खाडे यांनी पौरोहित्य केले.
या ‘चंपाषष्ठी उत्सवा’मध्ये गडावर ‘मार्तंडविजय ग्रंथा’चे पारायण, ‘मल्हारीसहस्रनाम याग’ होणार आहेत. ५ डिसेंबर या देवदिवाळीच्या निमित्ताने ‘फराळाचे रुखवत’ मांडले जाणार आहे. ६ डिसेंबर या दिवशी खंडोबा देवाला तेलवण आणि हळद करून हळद लावली जाणार आहे.
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ‘खंडोबाचा षड्रात्रोत्सव’ साजरा केला जातो. चंपाषष्ठीला देवाचे घट उठवले जातात. या वेळी पुरणपोळी आणि वांग्याचे भरीत-रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो. मणिमल्ल या दैत्याचा संहार करण्यासाठी श्री शंकरांनी या काळात मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता. त्यामुळे या उत्सवाला महत्त्व आहे.