षड्रात्‍सोवारंभ तरी पंढरपूर येथील श्री खंडोबा मंदिर ‘श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समिती’कडून दुर्लक्षित !

श्री खंडोबा मंदिराच्‍या दरवाजाच्‍या चौकटीवरील उडालेला रंग

पंढरपूर – देवदीपावलीपासून राज्‍यात सर्वत्र षड्रात्‍सोवारंभ (खंडोबा नवरात्र उत्‍सव) झाला. राज्‍यातील सर्वच खंडोबा देवाच्‍या मंदिरांमध्‍ये हा उत्‍सव उत्‍साहात साजरा केला जातो. असे असतांना पंढरपुरात महाद्वार परिसरातील ‘श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समिती’च्‍या अंतर्गत येणारे श्री खंडोबा मंदिर मात्र दुर्लक्षित आहे. यापूर्वी प्रत्‍येक वर्षी उत्‍सवापूर्वी या मंदिराची रंगरंगोटी केली जायची; यंदा मात्र मंदिर समितीकडून मंदिराची कोणतीही रंगरंगोटी-फुलांची सजावट केलेली नाही. या संदर्भात भाविक, भक्‍तगण, वारकरी यांच्‍याकडून तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

षड्रात्‍सोवारंभ होऊनही मंदिर प्रशासनाच्‍या अनास्‍थेमुळे खंडोबा मंदिरात कोणतेही धार्मिक विधी नाही ! – गणेश लंके, अध्‍यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षक कृती समिती, पंढरपूर

घरात जरी एखादा धार्मिक कार्यक्रम असला, तरी आपण द्वाराला तोरण लावणे, रांगोळी काढणे अशा कृती करतो. इथे मात्र नवरात्र असूनही मंदिर समितीच्‍या अनास्‍थेमुळे षड्रात्‍सोवारंभ झाला, तरी खंडोबा देवाचे मंदिर दुर्लक्षित आहे. भिंत आणि खांब यांचे रंग उडाले आहेत, काही ठिकाणी टवके उडाले आहेत, मंदिराचे नाव अस्‍पष्‍ट झाले आहे. मंदिर सरकारीकरणामुळे मंदिराविषयी जी श्रद्धा असायला हवी, ती नसल्‍याने सध्‍या मंदिरात तोरण लावलेले नाही, फुलांची सजावट नाही कि कोणताही धार्मिक विधी नाही. मंदिर समितीच्‍या या अनास्‍थेचा आम्‍ही निषेध करतो.

षड्रात्‍सोवारंभ होऊन पंढरपूर येथील श्री खंडोबा मंदिराची मंदिरे समितीच्‍या अनास्‍थेमुळे झालेली स्‍थिती

 

संपादकीय भूमिका :

राज्‍यातील मोठ्या देवस्‍थानांनी लहान देवस्‍थानांच्‍या दुरुस्‍तीचे दायित्‍व घेणे आवश्‍यक आहे !