संपादकीय : कर्म आणि शिक्षा !
‘जसे कर्म, तसे फळ’, असे शास्त्र आहे. प्रत्येक कर्माचे फळ मनुष्याला भोगावे लागते. वाईट कर्माचे फळ म्हणून व्यक्तीला त्रास सहन करावा लागतो, तर चांगल्या कर्माचे फळ म्हणून सुख उपभोगायला मिळते. या दोन्ही कर्मांमुळे जीवनमुक्त होता येत नाही, हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळेच ‘पाप मारक नाही आणि पुण्य तारक नाही’, असे म्हटले जाते. आता हे फळ कोण देते ? हेही पहाणे आवश्यक आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक देशामध्ये कायदे आहेत. या कायद्यात सांगण्यात आलेल्या वाईट कृत्यांवर न्यायालयात सुनावणी होऊन संबंधित व्यक्ती दोषी आढळली, तरच तिला शिक्षा केली जाते, अन्यथा वाईट कृत्य केले असतांनाही अनेक जण दोषी सिद्ध होत नाहीत. यामागे अनेक कारणे असतात. या कायद्यांनुसार कुणाला चांगल्या कर्माचे फळ देण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे ‘पृथ्वीवरील कायद्यांना मर्यादाच आहे’, असेच म्हणावे लागते; कारण ‘ते न्याय देत नाहीत’, असे लोकांना वाटते. त्याचप्रमाणे ‘ते अन्याय करतात’, असेही लोकांचे म्हणणे आहे. ‘हा न्याय आणि अन्याय यांचा भागही व्यक्तीच्या कर्माची फळे आहेत’, असेच अध्यात्मशास्त्र सांगते. अध्यात्मशास्त्राप्रमाणेच चित्रगुप्ताकडून आणि यमराजाकडून प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचे फळ दिले जाते अन् तिला त्या त्या जन्मात ते भोगावे लागते. हे सांगण्याचा उद्देश असा की, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना शिखांची धार्मिक संस्था असणार्या श्री अकाल तख्त साहिबने अमृतसर येथील सुवर्णमंदिरात उष्टी भांडी स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला न्यायालयाने २ विद्यार्थिनींवरील बलात्काराच्या प्रकरणी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला सुखबीर सिंह बादल यांनी क्षमा करून खटला मागे घेतला होता. या कारणावरून बादल यांना अकाल तख्तने शिक्षा सुनावली आहे. २ दिवस बादल यांना भांडी धुवावी लागणार आहेत, तसेच त्यानंतर ८ दिवस अन्य काही सेवा कराव्या लागणार आहेत. त्यांना शौचालयाच्या स्वच्छतेची शिक्षाही सुनावण्यात आली होती; मात्र त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने ती रहित करण्यात आली आहे. या शिक्षांतून त्यांना ‘अकाल तख्तने ठरवलेल्या पापांतून मुक्ती मिळेल’, असे सांगण्यात येते. शीख धर्मानुसार अमृतसर येथील मंदिरात अनेक लोक त्यांच्या वाईट कर्मांसाठी शिक्षा म्हणून सेवा करतात. अनेक शीख नेत्यांनी त्यांच्या पापांसाठी येथे शिक्षा भोगलेली आहे.
हिंदु धर्मातील नेत्यांनी कधी कुठे अशा प्रकारची शिक्षा भोगली आहे, असे ऐकिवात नाही; मुळात अशी काही व्यवस्थाच हिंदु धर्मानुसार नाही. कर्माचा सिद्धांत ठाऊक असूनही लोक वाईट कर्मे करत असतात. त्या कर्माची फळे पुढच्या जन्मात भोगावी लागली, तर ती त्यांना स्वीकारता येत नाहीत. प्रत्येकाच्या कर्मांमुळे समाजाची नियती बनत असते आणि समाजाला त्यानुसार भोग भोगावे लागत असतात. जर सत्तेवर येणारी व्यक्ती तिच्या मागील कर्मांमुळे त्या पदावर आली आणि तिने वाईट कर्मे करत कारभार केला, तर त्याची फळे जनतेलाच भोगावी लागतात अन् ‘ती जनतेच्या मागील जन्मातील कर्मांची फळे आहेत’, असेच म्हटले जाते. प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण मिळाल्यास त्याला कर्माचा सिद्धांत आणि कर्माची फळे कशी मिळतात ? याचे ज्ञान होईल अन् ते चांगले कर्म करतील किंवा वाईट कर्मे करण्याचे टाळतील !