थोडक्यात महत्वाचे . . .
शिवसेनेच्या पक्षचिन्हाविषयी ६ डिसेंबरला सुनावणी !
मुंबई – शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हाविषयी ६ डिसेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिले आहे. याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. या याचिकेवरील ही सुनावणी आहे.
नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी नौकेची धडक
२ खलाशांचा मृत्यू
मुंबई – नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी नौकेने धडक दिली. त्यात नौकेवरील २ खलाशांचा मृत्यू झाला. ही घटना अरबी समुद्रात घडली. या अपघातात नौसेनाच्या पाणबुडीची कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. या प्रकरणी मासेमारी नौकेवरील तांडेलविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
विज्ञापन आस्थापनाच्या माजी संचालिकेला जामीन !
घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याचे प्रकरण
मुंबई – मुंबईतील घाटकोपर परिसरात महाकाय लोखंडी फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या प्रकरणी विज्ञापन आस्थापनाच्या माजी संचालिका जान्हवी मराठे यांना सत्र न्यायालयाने जामीन संमत केला आहे. यातील मुख्य आरोपी भावेश भिंडे हाही जामिनावर बाहेर असून त्याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला आहे.
नवी मुंबईत जागोजागी कचर्याचे ढीग !
‘स्वच्छ नवी मुंबई मोहिमे’चा उडाला फज्जा !
नवी मुंबई – येथे जागोजागी कचर्याचे ढीग दिसत आहेत, तसेच स्वच्छतेच्या संदर्भात दिरंगाईही केली जात आहे. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा यांसारख्या उपनगरांमधील अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घणसोली आणि दिघा विभागांतील अस्वच्छतेविषयी स्वच्छता निरीक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिघा, ऐरोली येथे वेळेवर कचरा उचलला जात नाही. अनेक ठिकाणी ओला आणि सुका अशा प्रकारे कचर्याचे वर्गीकरण केले जात नाही.
‘ईडी’कडून उद्योगपती राज कुंद्रा यांना दुसरे समन्स !
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) उद्योगपती राज कुंद्रा यांना दुसरे समन्स पाठवले असून ४ डिसेंबरला चौकशीला उपस्थित रहाण्यास सांगितले आहे. अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मॉडेल आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ हिलाही ९ डिसेंबर या दिवशी चौकशीला उपस्थित रहाण्याविषयीचा समन्स पाठवण्यात आले आहे.