बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत ! – सतीश कोचरेकर, मुंबई प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
घाटकोपर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !
मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) – भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी कागदोपत्री निवेदने न देता कठोर पावले उचलावीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी घाटकोपर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात
बोलतांना केले. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि ‘इस्कॉन’च्या चिन्मय कृष्णदास प्रभु यांना झालेली अटक यांच्या निषेधार्थ घाटकोपर (पश्चिम) रेल्वेस्थानकाजवळ ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र सेना, व्रजदल, इस्कॉन यांसह सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आंदोलनात सहभागी धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या. संबंधित आशयाचे हस्तफलकही सर्वांनी हाती घेतले होते. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, यासाठी केंद्र सरकारला देण्यात येणार्या निवेदनावर नागरिकांकडून स्वाक्षर्या घेण्यात आल्या.
बांगलादेशासमवेतचे व्यापारी संबंध तोडावेत ! – दिनेश कोंडविलकर, व्रजदल
बांगलादेशामधील प्रतिकूल काळात ‘इस्कॉन’ने नागरिकांचा धर्म न पहाता अन्नदानाचे कार्य केले होते; पण आज त्याच संघटनेवर बंदी घालण्याची भाषा केली जात आहे. चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार आहे. बांगलादेशामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने दबाव आणायला हवा. आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोचण्यासाठी देशभर आंदोलने व्हायला हवीत. भारत सरकारने बांगलादेशासमवेत व्यापारी संबंध तोडावेत. त्यांच्याशी क्रिकेट खेळणेही सोडायला हवे.
मानवतेचे कार्य करणे गुन्हा आहे का ? – संतोष गांजले, धर्मप्रेमी
‘इस्कॉन’ने आपत्काळात मानवतेचे मोठे कार्य केले; पण असे करणेे हा गुन्हा आहे का ? बांगलादेशातील घटना पहाता देशभरात खेड्यापाड्यांतून आंदोलने व्हायला हवीत. भारत सरकारनेही बांगलादेशावर कारवाईसाठी तत्परतेने प्रयत्न करायला हवेत.
आंदोलनातून निर्माण झालेले भगवे वादळ भारतभर पसरवा ! – राजश्री पालांडे, माजी नगरसेविका, चेंबूर
‘धर्म टिकला, तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली, तर आपले संसार टिकतील’, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. यापुढे हिंदूंनी सर्वधर्मसमभाव बाजूला ठेवून आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे जाणून घेतले पाहिजे आणि त्याच्या रक्षणासाठी कृतीशील झाले पाहिजे. आंदोलनातून आपण जे भगवे वादळ निर्माण केले आहे, ते भारतभर पसरवायला हवे. आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे.
समितीचे श्री. प्रसाद मानकर, सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर आणि प्रविणा पाटील यांनीही त्यांचे विचार मांडले. घाटकोपर पश्चिम भाजपचे मंडळ अध्यक्ष श्री. अनिल निर्मळे, हिंदु राष्ट्र सेनेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.