अहिल्यानगर येथील नाना महाराज मंदिरात ९ ते १६ डिसेंबर या कालावधीत २३२ वा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ !
कस्तुरे, चवंडके, देशमुख, तुंगार, जाधव आणि रानडे यांची सुश्राव्य प्रवचने
अहिल्यानगर – येथील दिल्लीगेट जवळील श्री नाना महाराज मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला २३२ वा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ ९ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार असून जय्यत सिद्धता करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. भगवान देशमुख आणि सी.ए. श्री. संजय देशमुख यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, आमच्या घराण्यातील साक्षात्कारी तत्त्ववेत्ते संत श्री नाना महाराज यांनी शके १७८४ मध्ये येथे संजीवन समाधी घेतली. त्यांचे सुपुत्र श्री. नरहरिबुवा यांनी सुबक समाधी मंदिर उभारले. श्री नाना महाराज हे निस्सीम विठ्ठलभक्त होते. त्यांनी चालू केलेला ‘अखंड हरिनाम सप्ताह’ यावर्षी २३२ वे वर्ष पूर्ण करत आहे. शहरात इतकी वर्षे विनाखंड चाललेला हा एकमेव हरिनाम सप्ताह असून तो देशमुख परिवार श्रद्धेने आणि निष्ठेने चालवत आहे, हे विशेष आहे. श्री नाना महाराजांनी लिहिलेले ३०० स्फुट अभंग, सौरी इत्यादी रचना आणि ‘श्रीविवेक सुदर्शन’ हा ३०० अध्यायांचा ८ सहस्र ५०० ओव्यांचा हस्तलिखित ग्रंथ मंदिरात आजही सुस्थितीत उपलब्ध आहे.
नगर शहर आणि उपनगरातील भाविकांनी या सप्ताहातील सर्व कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.