Akhilesh Yadav On Survey : (म्हणे) ‘ज्यांना सर्वत्र खोदकाम करायचे आहे, ते एक दिवस देशाचा सुसंवाद आणि बंधुभाव गमावतील !’

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे खासदार अखिलेश यादव यांचे संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणावरून विधान !

संभल येथील मशिद

नवी देहली – ज्यांना सर्वत्र खोदकाम करायचे आहे, ते एक दिवस देशाचा सुसंवाद आणि बंधुभाव गमावतील, असे विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे खासदार अखिलेश यादव यांनी संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून केले.

खासदार यादव म्हणाले की, संसदेचे अधिवेशन प्रारंभ झाल्यापासून समाजवादी पक्षाने संभल घटनेचे सूत्र उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. संभल येथील घटनेवर आम्हाला सभागृहात आमचे म्हणणे मांडायचे आहे. तेथील पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. संभल येथील घटना इतर सूत्रांपासून लोकांची दिशाभूल करण्यासाठी भाजपची एक सुनियोजित रणनीती आहे.

अखिलेश व रामगोपाल यादव

(म्हणे) ‘देशभरात अशांतता निर्माण करण्याचा कट !’ – खासदार रामगोपाल यादव

समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव म्हणाले की, मशिदीच्या सर्वेक्षणांद्वारे देशभरात अशांतता निर्माण करण्याचा कट रचला जात आहे. (लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करत लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक असणार्‍या न्यायालयाच्या माध्यमांतून कायदेशीर कृती करणार्‍यांना ‘अशांतता निर्माण करणारे’ म्हणणारेच या देशात अशांतता निर्माण करत आहेत. न्यायालयाने अशांवरच कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक) सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेऊन असे आदेश देणार्‍या न्यायाधिशांवर कारवाई करावी. (राजकीय स्वार्थासाठी न्यायाधिशांनाच दोषी ठरवण्याची मजल गेलेले भारतातील राजकारणी ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

मुसलमान आक्रमकांनी या देशावर आक्रमण करून हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या आणि हे आजही त्यांच्या वंशजांना ठाऊक असूनही ते त्याचे समर्थन करत आहेत. यावरून हिंदू नाही, तर धर्मांध मुसलमानच बंधुभाव ठेवू इच्छित नाहीत, हेच स्पष्ट होते. तरीही मतांच्या स्वार्थासाठी वैचारिक सुंता करून घेतलेले अखिलेश यादव यांच्यासारखे लोक हिंदूंनाच दोषी ठरवत आहेत, हे लक्षात घ्या !