Sheikh Hasina Targets Muhammad Yunus : महंमद युनूस यांच्यामुळेच बांगलादेशात होत आहेत सामूहिक हत्या !

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा आरोप

मुहम्मद युनूस यांनीच अत्यंत सावधपणे तयार केलेल्या योजनेद्वारे सामूहिक हत्या घडवून आणल्या आहेत – शेख हसीना

ढाका (बांगलादेश) – महंमद युनूस यांनी बांगलादेशाला अराजकतेकडे ढकलले आहे. सध्याच्या सरकारने देश उद्ध्वस्त केला आहे. युनूस यांच्यामुळेच बांगलादेशात सामूहिक हत्या होत आहेत आणि हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, असे विधान बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीग पक्षाच्या अध्यक्षा शेख हसीना यांनी त्यांच्या पक्षाच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलतांना केले. त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या आक्रमणांसाठीही युनूस सरकारवरही टीका केली. यावर्षी ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपद आणि बांगलादेश सोडावे लागले होते. सध्या त्या भारतात रहात आहेत.

मी लोकांसाठी माझा देश सोडला !

ऑगस्टमध्ये त्यांचे सरकार कोसळल्याविषयी शेख हसीना म्हणाल्या की, मी जर  सत्तेत रहाण्याचा प्रयत्न केला असता, तर आणखी रक्तपात झाला असता. माझे वडील मुजीबुर रहमान यांच्यासारखे मला ठार मारण्याची योजना होती. अशा परिस्थितीत ढाका सोडून जाणे मला योग्य वाटले. मला सत्तेत रहाण्याची आवश्यकता नाही. जर सुरक्षा कर्मचार्‍यांनी गोळीबार केला असता, तर अनेक लोक मारले गेले असते. (मारले जाणारे लोकच हिंसाचार करणारे होते, तर त्यात चुकीचे काय होते ? असा प्रश्‍न उपस्थित होतो; कारण हेच लोक अजूनही हिंदूंवर अत्याचार करत आहेत आणि त्यांचा वंशसंहार करण्याच्या प्रयत्नांत आहेत ! – संपादक) मला ते नको होते. (पंतप्रधानपदी असणार्‍या व्यक्तीने स्वतःला काय वाटते यापेक्षा समाजाचे कशामुळे भले होणार आहे, रक्षण होणार आहे, हे पहाणे आवश्यक आहे ! – संपादक)

बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील आक्रमणांविषयी शेख हसीना म्हणाल्या की, राज्यघटनाविरोधी पद्धतीने सत्ता कह्यात घेणार्‍या युनूस सरकारने अशा लोकांना शिक्षा करण्यात अयशस्वी ठरल्यास त्यांना मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठीही शिक्षा केली जाईल. लोकांच्या जिवाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलायला हवीत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात कोण काय करत आहे, हे आता जगजाहीर आहे. तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने पावले उचलणे आता अपरिहार्य झाले आहे. वर्ष १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस उपाय केले नाहीत, ते काम आताच्या सरकारने करणे आवश्यक झाले आहे !