गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणातील वाहनचालकाकडून ७ वेळा अपघात झाल्याची माहिती समोर !
आधीच्या ६ घटनांमध्ये दोषी आढळल्यानंतरही त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नसल्याचे उघडकीस !
गोंदिया – येथे शिवशाही बस अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा या दरम्यान हा अपघात झाला होता. भरधाव वेगात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती मिळत होती. बसचालक प्रणय रायपूरकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवशाही बसचा चालक प्रणय रायपूरकर हा वर्ष २०११ मध्ये भंडारा आगारात वाहनचालक म्हणून रुजू झाला होता. त्याचा बॅच क्रमांक ३१८ असून गेल्या १२ वर्षांत प्रणय रायपूरकर याच्याकडून ७ वेळा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणांमध्ये त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली नव्हती.
डिसेंबर २०१२ ते २९ नोव्हेंबर २०२४ या काळात प्रणय रायपूरकर याच्या हातून एस्.टी.चे ७ अपघात झाले आहेत. प्रणय रायपूरकरकडून २० डिसेंबर २०१२ या दिवशी पहिला अपघात झाला होता.
आरोपीला आधीच्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा झाली असती, तर गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणातील मृत्यू टाळता आले असते ! दोषी आढळल्यानंतरही कोणतीही कारवाई न करणार्या दायित्वशून्य अधिकार्यांनाही दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायला हवी. |