संस्थानकालीन आचरे गावची ‘गावपळण’ १५ डिसेंबरला होणार
३ दिवस सीमेबाहेर वास्तव्य केले जात असल्याने गाव होणार निर्मनुष्य !
(गावपळण म्हणजे गावातील लोकांनी गावाच्या बाहेर जाऊन रहाणे.)
मालवण – तालुक्यातील संस्थानकालीन आचरे गावची ‘गावपळण’ प्रत्येक ३ ते ५ वर्षांनी होत असते. या वर्षी श्री रामेश्वरदेवाने दिलेल्या कौलानुसार १५ डिसेंबरला ‘गावपळण’ होणार आहे. ३ दिवस चालणार्या या गावपळणीच्या कालावधीत संपूर्ण आचरेवासीय कुत्रे, मांजर, गुरे, ढोरे, कोंबड्या यांच्यासह गावाच्या सीमेच्या बाहेर एकत्रित रहाणार असल्याने आचरे गाव निर्मनुष्य होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे सचिव संतोष मिराशी यांनी दिली.
या गावात हिंदूंसह अन्य धर्मियांचीही वस्ती आहे. तेही या गावपळणीत सहभागी होत असतात. यापूर्वी वर्ष २०१९ च्या डिसेंबर महिन्यात गावपळण झाली होती. यावर्षी गावपळणीचे वर्ष असल्याने मानकर्यांच्या उपस्थितीत २ डिसेंबर या देव दीपावलीच्या दिवशी दुपारी श्री रामेश्वरदेवाचा कौल प्रसाद घेण्यात आला. या वेळी देवाने दिलेल्या कौल प्रसादानुसार १५ डिसेंबर २०२४ या दिवशी गावपळण होणार आहे.
या कालावधीत आचरे येथील ग्रामस्थ गावाच्या सीमेबाहेर कारीवणे नदीकिनारी, चिंदर, त्रिंबक, पोयरे, मुणगे, आडबंदर, वायंगणी, सडेवाडी या भागात राहुट्या (तात्पुरती घरे) उभारून रहातात. शेकडो वर्षांप्रमाणे आजच्या विज्ञान युगातही ही प्रथा ग्रामस्थ मोठ्या हौशीने आणि श्रद्धेने जपतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. या कालावधीत अन्य कोणतेही काम गावात केले जात नसल्याने संपूर्ण गाव भजन, गाणी, खेळ, प्रबोधनाचे कार्यक्रम अशा माध्यमांतून एकत्रितपणे घालवतात.