लोकांचा विरोध असूनही धारगळ (गोवा) पंचायतीकडून ‘सनबर्न’ कार्यक्रमाला संमती
सरकारच्या दबावाला पंचायत नमल्याचा ग्रामस्थांचा आरोप
पेडणे, २ डिसेंबर (वार्ता.) – ‘धारगळ येथे ‘सनबर्न’ हा इलेक्ट्रॉनिक नृत्य आणि संगीत यांचा कार्यक्रम होऊ नये’, असा ठराव पंचायतीच्या ग्रामसभेने यापूर्वी घेतलेला असूनही धारगळ पंचायत मंडळाने २ डिसेंबर या दिवशी लोकांचा विरोध डावलून धारगळ येथे ‘सनबर्न’च्या आयोजनाला संमती दिली. धारगळ पंचायत मंडळाच्या बैठकीत ५ विरुद्ध ४ मतांनी ‘सनबर्न’च्या आयोजनाला तात्पुरती संमती देण्यात आली. यामुळे सरकारच्या दबावाला पंचायत मंडळ नमल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. पेडणेचे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि इतर यांनी ‘सनबर्न’च्या विरोधात लढा देणार असल्याचे यापूर्वीच घोषित केलेले असल्याने त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्तात झाली पंचायत मंडळाची बैठक
‘सनबर्न’च्या आयोजनाला संमती देण्याच्या ठरावाला सरपंच सतीश धुमाळ, उपसरपंच दीप्ती नारोजी, पंचसदस्य अर्जुन कानोळकर, दाजी शिरोडकर आणि उत्तम वीर यांनी संमती दिली, तर पंचसदस्य भूषण नाईक, अनिकेत साळगावकर, अमिता हरमलकर आणि प्रीती कानोळकर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. पंचायत मंडळाच्या या बैठकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पंचायत परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पंचायत मंडळावर कुणाचाही दबाव नाही ! – सरपंच सतीश धुमाळ
यानंतर पत्रकारांशी बोलतांना सरपंच सतीश धुमाळ म्हणाले, ‘‘सनबर्न’ला अनुज्ञप्ती देण्यासाठी पंचायत मंडळावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही सरकारच्या नियमानुसार या कार्यक्रमाला अनुज्ञप्ती दिलेली आहे. या महोत्सवामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, तसेच टॅक्सी, मोटरसायकल पायलट यांनाही व्यवसाय मिळणार आहे. पंचायतीलाही यापासून महसूल मिळणार आहे आणि या चांगल्या हेतूनेच ‘सनबर्न’ला संमती दिली आहे.’’
पंचायत मंडळाच्या निर्णयावरून ग्रामस्थ संतप्त
धारगळ पंचायतीने ‘सनबर्न’ला संमती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. येथील ज्येष्ठ नागरिक रोहिदास हरमलकर म्हणाले, ‘‘सनबर्न’ ही आमची संस्कृती नव्हे. पेडणे तालुक्यात मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत आणि संस्कृतीचा वारसा जोपासणारा तालुका म्हणून पेडणे तालुक्याची ओळख आहे. ‘सनबर्न’चे आयोजन म्हणजे संस्कृतीवर घाला आहे.
पंचायत मंडळाच्या बैठकीला पंचसदस्य काळ्या काचा असलेल्या जीपमधून आले : पोलिसांनी ठोठावला दंड
‘सनबर्न’च्या आयोजनाला संमती देण्यासाठी पंचायत मंडळाने आयोजित केलेली बैठक आणि या बैठकीच्या ठिकाणी काही पंचसदस्यांनी ज्या पद्धतीने प्रवेश मिळवला, हे सूत्रही एक चर्चेचा विषय ठरला आहे. या बैठकीला पंचसदस्य अर्जुन कानोळकर हे त्यांची काळ्या काचा असलेली जीप घेऊन आले होते. त्यांनी पोलिसांसमोरच त्यांची जीपगाडी उभी केली आणि ते बैठकीसाठी आत गेले. या घटनेचा व्हिडिअो सामाजिक माध्यमात प्रसारित झाल्यानंतर पेडणे पोलिसांनी जीपच्या मालकाला १ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. जीपच्या मालकाचे नाव पूजा कानोळकर असे असून जीपच्या चालकाचे नाव वल्लभ वराडकर असे आहे.
‘सनबर्न’ उधळून लावू ! – विरोधी गटातील पंचसदस्य
‘सनबर्न’च्या आयोजनाला विरोध करणारे पंचसदस्य भूषण उपाख्य प्रवीण नाईक आणि अनिकेत साळगावकर म्हणाले, ‘‘धारगळवासियांना ‘सनबर्न’ कार्यक्रम नको असतांना सरपंचांसह काही जण तो लोकांवर लादत आहेत. लोकांना विश्वासात न घेताच पंचायत मंडळाने ‘सनबर्न’ला संमती दिली आहे आणि हा ठराव आम्हाला अमान्य आहे. ज्या दिवशी ‘सनबर्न’ चालू होईल, त्या दिवशी आम्ही तेथे घुसून तो कार्यक्रम उधळून लावणार आहोत.’