महाराष्ट्रात सायंकाळी वाढलेल्या मतदानाची टक्केवारी योग्यच ! – निवडणूक आयोग
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या वेळी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख इतके मतदान झाले. याविषयी काहींनी शंका उपस्थित केली होती. महाराष्ट्रात सकाळपासून प्रत्येक घंट्याला सरासरी ५० ते ६० इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीत राज्यात १ लाखाहून अधिक मतदानकेंद्रे होती. तेथे सायंकाळी ६ पर्यंत आलेल्या नागरिकाचे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात सायंकाळी वाढलेल्या मतदानाची टक्केवारी योग्यच आहे, अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम् यांनी स्पष्ट केली आहे.
निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’ यंत्रांत हस्तक्षेप झाल्याची शंका महाविकास आघाडीमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित केली. याविषयी एस्. चोक्कलिंगम् म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची तुलना झारखंडमधील मतदानाशी केली जाते; परंतु दोन्ही राज्यांतील मतदानात भेद आहे. झारखंडमधील मतदान ७ ते ९ या वेळेत अधिक होते. याउलट महाराष्ट्रात सकाळी मतदानाची टक्केवारी अल्प असते, तर सायंकाळी मतदान अधिक होते, हे आजवरच्या राज्यातील मतदानाच्या टक्केवारीतून दिसून येते. झारखंडच्या तुलनेत महाराष्ट्र मोठे राज्य आहे. त्यामुळे अशी तुलना होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील मतदानप्रक्रिया अतिशय पारदर्शक आहेे.’’
‘इ.व्ही.एम्.’ यंत्राच्या ‘कंट्रोल युनिट’मध्ये जी ‘चीप’ असते, ती क्रमांकानुसार ‘सेट’ केलेली असते. ज्या क्रमांकाचे बटण दाबले जाईल, त्या प्रमाणे हे यंत्र मोजमाप करते. यामध्ये कोणतीही छेडछाड करता येऊ शकत नाही. हे यंत्र उघडण्याचा प्रयत्न केल्यास ते बंद पडते. उमेदवाराच्या नावाने नव्हे, तर क्रमांकानुसार हे यंत्र मतमोजणी करते. आपण जे बटण दाबतो, त्यालाच मतदान झाले आहे का ? हे ‘व्हीव्हीपॅट’मध्ये पहाता येते. त्यामुळे यामध्ये काही पालट करणे, हे अशक्य आहे. त्यातही कुणाला शंका असल्यास ते निवडणूक आयोगाकडे त्याविषयी तक्रार करू शकतात. यंत्रामधील तांत्रिक मोजमाप हे अत्यंत पारदर्शक आहे. या यंत्राला ‘ब्लु टूथ’ किंवा अन्य कोणतेही ‘वायरलेस कनेक्शन’ जोडता येऊ शकत नाही. मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही यंत्रे सील केली जातात. त्यापूर्वी त्यावरील मतदानाची अंतिम संख्या पाहिली जाते. त्यानंतर ही यंत्रे ‘स्ट्राँगरूम’ (कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेली खोली) मध्ये सुरक्षित ठेवली जातात. मतमोजणीसाठी जेव्हा ही यंत्रे काढली जातात. तेव्हा मोजणीला प्रारंभ करण्यापूर्वी सील करतांना जो अंक दाखवला होता, तीच मतांची आकडेवारी आहे ना ? हे प्रथम पाहिले जाते. ही सर्व प्रक्रिया होत असतांना प्रत्येक वेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तेथे उपस्थित असतात. या सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. त्यानंतर कुणाला शंका असेल, तर मतमोजणीनंतर १० दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येऊ शकते, तसेच याविषयी उच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करता येऊ शकते’, असे चोक्कलिंगम् यांनी सांगितले.