‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

‘ऑगस्‍ट २०२४ मध्‍ये ‘आध्‍यात्मिक व्‍यक्‍तीमत्त्व विकास’ शिबिरासाठी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाण्‍याची आणि आश्रमातील दिनचर्या अनुभवण्‍याची संधी मिळाली. मी आश्रमातील सहजीवन अनुभवत असतांना माझे झालेले चिंतन लिहून देण्‍याचा प्रयत्न करत आहे. या चिंतनाचा काही भाग आपण २ डिसेंबर या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.                                 (भाग २)

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/859490.html

२. आश्रमात कौशल्‍यपूर्ण केलेले काटेकोर नियोजन

२ आ ३. दैनंदिन कृती करण्‍यासाठी लागणारे साहित्‍य सुस्‍थितीत ठेवलेले असणे : प्रत्‍येक खोलीत कपडे वाळत घालायला पुरेशा दोर्‍या आणि काठी होती. तेथील कपाटात अतिरिक्‍त पायपुसणी ठेवली होती. प्रत्‍येक प्रसाधनगृहात ‘साबण चुरा, अंघोळीचा साबण, कपडे धुण्‍यासाठी ब्रश, खडे मीठ’ इत्‍यादी ठेवलेले होते. खोल्‍यांतील सगळे दिवे आणि पंखे चालू स्‍थितीत होते. ‘कपडे धुण्‍याचे यंत्र, इस्‍त्री, पाणी तापवायला ‘हीटर’, केरसुणी, लादी पुसायला मॉप’ इत्‍यादी साहित्‍य खोलीत सुस्‍थितीत ठेवलेले होते.

२ आ ४. ‘खोलीतील प्रत्‍येक वस्‍तू वापरतांना काय काळजी घ्‍यायची ?’, याची माहिती खोलीत लिहिलेली असणे : ‘खोलीतील सर्व वस्‍तू वापरतांना काय काळजी घ्‍यायची ?’, याची माहिती खोलीत लिहिलेली होती. त्‍यामुळे १० दिवसांत कुणालाही कुठलीही अडचण आली नाही. निवासाच्‍या खोलीतील १० दिवसांच्‍या स्‍वच्‍छतेचे दायित्‍व आमच्‍यावर होते.

श्री. अनिकेत विलास शेटे

२ आ ५. निवासस्‍थानापासून शिबिरासाठी आश्रमात येण्‍यासाठी आणि रात्री परत निवासस्‍थानी जाण्‍यासाठी वाहने उपलब्‍ध होती आणि त्‍यांच्‍या वेळा ठरलेल्‍या होत्‍या. वाहनांची वाट बघण्‍यात वेळ गेला नाही.

२ आ ६. निवासव्‍यवस्‍था पाहून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘निवासाच्‍या खोलीतील सर्व वस्‍तू नीट वापरणे आणि पुढील शिबिरार्थींना वापरण्‍यायोग्‍य ठेवणे आवश्‍यक आहे’, याची आम्‍हाला जाणीव झाली.

आ. ‘घरी पाहुणे आल्‍यावर त्‍यांचे नियोजन कसे करायला हवे ?’, हे मला शिकायला मिळाले आणि ‘अतिथी देवो भव !’ याची व्‍याप्‍ती माझ्‍या लक्षात आली.

२ इ. शिबिरातील प्रत्‍येक सत्र वेळेत चालू होत असणे आणि वेळेत संपत असणे : शिबिर प्रतिदिन सकाळी ९.३० वाजल्‍यापासून रात्री १० वाजेपर्यंत होते. त्‍यातील प्रत्‍येक दिवसातील प्रत्‍येक मिनिटाचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. प्रत्‍येक रात्री दुसर्‍या दिवसाच्‍या शिबिराच्‍या रूपरेषेसंबंधी संदेश भ्रमणभाषवर पाठवला जात होता. शिबिरातील प्रत्‍येक सत्र संपण्‍यापूर्वी पुढील सत्र घेणारे साधक उपस्‍थित असत. शिबिरातील प्रत्‍येक सत्र ठरलेल्‍या वेळेत चालू होऊन ठरलेल्‍या वेळेत संपत असेे.

३. सनातनच्‍या आश्रमाची जाणवलेली वैशिष्‍ट्ये

३ अ. साधकसंख्‍या पुष्‍कळ असूनही वातावरण शांत असणे : आश्रमात साधकसंख्‍या पुष्‍कळ आहे; पण प्रत्‍यक्षात तसे जाणवत नाही; कारण येथेे गडबड, गोंधळ, चर्चा किंवा वाद एकदाही पहायला मिळाला नाही.

३ आ. प्रत्‍येक कृती नियोजनबद्ध आणि विचारून केली जाणे : ‘प्रत्‍येक सेवा करण्‍याची वेळ, पद्धत आणि ‘त्‍याचे दायित्‍व कुणाकडे आहे ?’, हे ठरलेले आहे. ‘नियोजन करणे आणि प्रत्‍येक कृती विचारून करणे’, हे येथील सूत्र आहे. येथे कुणीही स्‍वतःच्‍या मनानुसार वागत नाही.

३ इ. ‘प्रत्‍येक साधकाचा इतरांप्रती प्रीतीभाव आहे’, जो सहजीवनासाठी आवश्‍यक आहे.

३ ई. आश्रमात वावरतांना ‘आश्रमातील अन्‍य साधकांना त्रास होऊ नये आणि गुरुधनाची हानी होऊ नये’, याची प्रत्‍येकाला सतत जाणीव असणे : आश्रमसेवा करतांना किंवा आश्रमात वावरतांना ‘आपल्‍या शारीरिक हालचाली, कृती, बोलणे व्‍यवस्‍थितच व्‍हायला हवे. त्‍याचा अन्‍य कुणाला त्रास होऊ नये’, याची जाणीव प्रत्‍येकाला असते. साधकांच्‍या मनात ‘आपल्‍यामुळे गुरुधनाची हानी होऊ नये’, असा विचार असतो.

३ उ. आनंदी साधक : सगळे साधक सदैव तणावमुक्‍त आणि आनंदी दिसत होते. त्‍यांचा सतत ईश्‍वरी अनुसंधानात रहाण्‍याचा प्रयत्न असतो. साधकांचे ‘सतत ईश्‍वरी अनुसंधानात राहून वैयक्‍तिक आध्‍यात्‍मिक उन्‍नती करून घेणे’, हे ध्‍येय असल्‍यामुळे मायेतील मानवी भावना आणि आवश्‍यकता त्‍यांना मिथ्‍या वाटत असाव्‍यात.

– श्री. अनिकेत विलास शेटे, पिंपरी चिंचवड, पुणे. (८.९.२०२४)

(क्रमशः)

या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/860085.html