‘देवाने पृथ्‍वीवरील लोकसंख्‍या मर्यादित कशी ठेवली आहे ?’, या संदर्भातील आध्‍यात्मिक विश्‍लेषण !

‘पृथ्‍वीवर एकाच वेळी असंख्‍य जीव जन्‍माला येतात, असंख्‍य लोक जीवन जगतात आणि असंख्‍य लोक मृत्‍यू पावतात’, ही सर्व प्रक्रिया कशी घडते ? पृथ्‍वीवर लोकसंख्‍येचा प्रकोप न होता ती मर्यादित कशी रहाते ?’, यांविषयी देवाच्‍या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. ब्रह्मांडात अनेक पृथ्‍वींची निर्मिती कशी होते ?

आदिशक्‍तीतून त्रिगुणांची निर्मिती होते. त्रिगुणांतून पंचतत्त्वांची निर्मिती होते. नंतर पंचतत्त्वांद्वारे ब्रह्मांडात अनेक पृथ्‍वींची निर्मिती होते.

२. त्रिगुणांचे गुणधर्म

२ अ. सत्त्व : सत्त्वगुणातून पृथ्‍वीची स्‍थिती, म्‍हणजे पृथ्‍वीचे अस्‍तित्‍व टिकून रहाण्‍याचे कार्य होते.

२ आ. रज : रजोगुणामुळे पृथ्‍वीवरील जीवसृष्‍टीची जडणघडण होत असते.

२ इ. तम : तमोगुणाद्वारे पृथ्‍वीचा लय होतो, म्‍हणजे शेवटी ती नष्‍ट होते.

३. पृथ्‍वीचा समतोल त्रिगुणांद्वारे साधलेला आहे !

त्रिगुण एकाच वेळी जीवसृष्‍टीत कार्य करत असतात. रजोगुणामुळे पृथ्‍वीवरील लोकसंख्‍या वाढीस लागते. सत्त्वगुणामुळे लोकसंख्‍या काही काळ टिकून रहाते आणि तमोगुणामुळे ती नष्‍ट होते, म्‍हणजे लोक मृत्‍यूमुखी पडतात.

त्रिगुणांच्‍या या गुणधर्मांमुळे पृथ्‍वीवर एकाच वेळी जीव जन्‍माला येतात, असंख्‍य लोक काही वर्षे जीवन जगतात आणि त्‍याच वेळी काही लोक मृत्‍यू पावतात. या सर्वांचा परिणाम म्‍हणून पृथ्‍वीवर लोकसंख्‍या मर्यादित रहाते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (६.८.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक