बांगलादेशी रुग्णांनी भारताच्या राष्ट्रध्वजाला सलामी द्यावी, तरच उपचार होतील !
बंगालमधील डॉक्टरांनी त्यांच्या चिकित्सालयाच्या बाहेर लिहिला संदेश
कोलकाता – बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांच्या निषेधार्थ बंगालमधील डॉक्टरांनी बांगलादेशी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. डॉ. शेखर बंदोपाध्याय यांनी सिलीगुडी येथील त्यांच्या चिकित्सालयात तिरंगा ध्वज फडकवला आहे. ‘भारताचा राष्ट्रध्वज हा आपल्या आईसारखा आहे. कृपया चिकित्सालयात प्रवेश करण्यापूर्वी तिरंग्याला सलाम करा. विशेष करून बांगलादेशी रुग्णांनी राष्ट्रध्वजाला सलामी द्यावी, तरच त्यांच्यावर उपचार होतील’, असे राष्ट्रध्वजाखाली लिहिण्यात आले आहे.
डॉ. शेखर बंदोपाध्याय ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलतांना म्हणाले, ‘‘बांगलादेशामध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान होत असल्याचे पाहून मला वाईट वाटते. एक डॉक्टर म्हणून मला रुग्णांकडे दुर्लक्ष करायचे नाही; पण माझ्या देशात येणार्या लोकांनी माझ्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा, माझ्या मातृभूमीचा आदर केला पाहिजे. बांगलादेश तालिबानी मानसिकतेत गुरफटलेला दिसतो.’’
बंगालमधील अनेक तज्ञ डॉक्टरांनी बांगलादेशी रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. बालरोगतज्ञ डॉ. चंद्रनाथ अधिकारी यांनी घोषित केले आहे की, ते त्यांच्या खाजगी चिकित्सालयात कोणत्याही बांगलादेशी रुग्णावर उपचार करणार नाहीत. ‘माझा देश प्रथम येतो. बांगलादेशात जे घडत आहे, ती आम्हा सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
संपादकीय भूमिका
असे राष्ट्रप्रेमी डॉक्टर सर्वत्र हवेत ! |