WHF GenevaProtest Bangladeshi Minorities : बांगलादेशातील हिंदूंच्‍या रक्षणार्थ तेथे संयुक्‍त राष्‍ट्रांची शांती सेना पाठवा !

जिनीव्‍हा (स्‍वित्‍झर्लंड) येथे झालेल्‍या संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या बैठकीत ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’ची जोरदार मागणी

जिनीव्‍हा (स्‍वित्‍झर्लंड) – ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेचे युरोप खंडाचे अध्‍यक्ष दीपन मित्रा यांनी येथे नुकत्‍याच झालेल्‍या संयुक्‍त राष्‍ट्रांनी अल्‍पसंख्‍यांविषयीच्‍या समस्‍यांवर आयोजित केलेल्‍या १७ व्‍या सत्राच्‍या बैठकीत सहभाग नोंदवला. या वेळी त्‍यांनी बांगलादेशात चालू असलेल्‍या हिंदूंच्‍या नरसंहाराविषयीची माहिती सांगून त्‍यांच्‍या रक्षणार्थ उपाययोजना काढण्‍याची संयुक्‍त राष्‍ट्रांकडे मागणी केली.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी झालेले मानवाधिकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सदस्य, त्यात उजवीकडून दुसरे श्री. दीपन मित्रा

मित्रा यांनी संयुक्‍त राष्‍ट्रांकडे ‘बांगलादेशातील २ कोटी ८० लाख अल्‍पसंख्‍य हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी बांगलादेशमध्‍ये संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या शांती सेनेची तात्‍काळ रवानगी करण्‍यात यावी’, अशी मागणी केली. यासमवेतच आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांकांवरील अत्‍याचारांचा निषेध करण्‍याची आवश्‍यकता आहे, तसेच बांगलादेशावर यासंदर्भात दबाव आणला पाहिजे, असेही ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’च्‍या वतीने त्‍यांनी आवाहन केले. ही माहिती मित्रा यांनी स्‍वत: ‘सनातन प्रभात’ला कळवली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीची माहिती देणारे ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’चे प्रसिद्धीपत्रक –

१. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या या सत्रात अध्‍यक्षस्‍थानी अनास्‍तासिया क्रिकले होत्‍या, तर संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मानवाधिकार आयोगाचे अध्‍यक्ष ओमर झनिबर, संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मानवाधिकार विभागाचे अध्‍यक्ष वोल्‍कर तुर्क, तसेच प्रा. निकोलस लेवरात हे सहअध्‍यक्ष होते.

२. या वेळी बांगलादेशातील समस्‍या, आव्‍हाने आणि अडथळे ओळखणे, यांवरही चर्चा करण्‍यात आली.

जिनीव्‍हा शहरातील ऐतिहासिक ‘ब्रोकन चेअर’ येथे हिंदूंचे आंदोलन !

३. या बैठकीला ‘वर्ल्‍ड हिंदू फेडरेशन’समवेतच ‘पीस फाऊंडेशन यूके’, ‘इंटरनॅशनल सेक्‍युलर मूव्‍हमेंट यूके’, ‘ग्‍लोबल हिंदू कोएलिशन’, ‘सनातन असोसिएशन लंडन’, ‘परबत्ता चटगाव जनसंहती समिती’, ‘सेक्‍युलर मूव्‍हमेंट यूके’, ‘बांगलादेश ख्रिश्‍चन असोसिएशन युरोप’ यांनीही बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांकांवर होणार्‍या अत्‍याचारांचे सूत्र उपस्‍थित केले.

४. जिनीव्‍हा येथील ‘बांगलादेश मिशन’च्‍या प्रतिनिधीने बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंचा छळ होत असल्‍याचे नाकारले. दीपन मित्रा यांनी तेथील हिंदूंवर झालेल्‍या अत्‍याचारांच्‍या अहवालाचा उल्लेख करत त्‍यांचा तीव्र शब्‍दांत निषेध केला.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंवरील अनन्‍वित अत्‍याचारांच्‍या विरुद्ध जागतिक व्‍यासपिठावर प्रयत्न करणार्‍या ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’चे अभिनंदन ! भारतातील बहुतांश हिंदू मात्र अशा वेळी निष्‍क्रीय रहातात, हे भारतासाठी लज्‍जास्‍पद !