दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : रेल्‍वेच्‍या धडकेत एकाचा मृत्‍यू, दुसरा घायाळ;आकाशातून संयंत्रवजा उपकरण खाली पडले !…

रेल्‍वेच्‍या धडकेत एकाचा मृत्‍यू, दुसरा घायाळ

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – नंदुरबार येथून जळगावला आलेल्‍या दोन मित्रांना धावत्‍या रेल्‍वेने धडक दिल्‍याने एकाचा जागीच मृत्‍यू झाला, तर दुसरा गंभीर घायाळ आहे. ओम वाघेला (वय २३ वर्षे) असे मृताचे नाव असून समर्थ रघुवंशी (वय २२ वर्षे) असे घायाळाचे नाव आहे. रुळांवरून चालतांना एक्‍सप्रेसची त्‍यांना धडक बसली.


आकाशातून संयंत्रवजा उपकरण खाली पडले !

बुलढाणा – येथील अंचरवाडी येथे आकाशातून संयंत्रवजा उपकरण खाली पडले. हे उपकरण हवामान विभागाचे असल्‍याचा अंदाज आहे. उपकरणावर कोरियन भाषेतील लिखाण आहे. ‘हे हवामान विषयक उपकरण आहे. ते आमच्‍या संगणक प्रणालीला जोडलेले आहे. त्‍यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्‍याचे कारण नाही’, असे प्रादेशिक हवामान खात्‍याच्‍या नागपूर केंद्राने स्‍पष्‍ट केले आहे.


राज्‍यात ‘लेप्‍टोस्‍पायरोसिस’चे रुग्‍ण आणि मृत्‍यूच्‍या प्रमाणात वाढ !

नागपूर – नागपूरसह राज्‍यातील काही भागांत डेंग्‍यू, चिकनगुनिया आजाराचे रुग्‍ण वाढले होते. आता राज्‍यात ‘लेप्‍टोस्‍पायरोसिस’चे रुग्‍ण आणि त्‍या रुग्‍णांचा मृत्‍यू होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. वर्ष २०२३ च्‍या तुलनेत यंदा या आजाराने तिप्‍पट मृत्‍यू होत आहेत. सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या अहवालानुसार, १ जानेवारी २०२४ ते २८ नोव्‍हेंबर २०२४ या काळात ९२४ रुग्‍ण आढळले. त्‍यापैकी २१ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला.


जळगाव जिल्‍ह्यात ३ अल्‍पवयीन मित्रांची आत्‍महत्‍या !

जळगाव – जळगाव जिल्‍ह्यात ३ अल्‍पवयीन मित्रांनी आत्‍महत्‍या केली. २ विद्यार्थी इयत्ता ९ वीमध्‍ये शिकत होते, तर तिसरा विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. हर्षल सोनवणे, वेदांत नाले आणि ओम उपाख्‍य साई चव्‍हाण अशी त्‍यांची नावे आहेत. कोणत्‍या तरी जाचाला कंटाळून हा निर्णय घेतल्‍याचे सांगितले जात आहे.