शैक्षणिक सहली कि मौजमजा ?

राज्‍यात शाळेच्‍या माध्‍यमांतून प्रतिवर्षी विद्यार्थ्‍यांच्‍या सहलींचे आयोजन केले जाते. दशकभरापूर्वीपर्यंत बर्‍याच शाळांकडून या सहली शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक अशा ठिकाणी नेल्‍या जात होत्‍या; पण गेल्‍या काही वर्षांपासून शाळांच्‍या सहली विविध ‘रिसॉर्ट’ला नेण्‍यात येत असल्‍याचे आढळून येत आहे. या रिसॉर्टमध्‍ये काय असते, तर तरणतलाव किंवा पाण्‍याचा पूल असतो, तसेच कृत्रिम पद्धतीने सजवण्‍यात आलेली फुलझाडे, गवत इत्‍यादी असते. निवासासाठी लहानसे छोटेखानी हॉटेल असते आणि विविध प्रकारच्‍या खाद्यपदार्थांची अखंड रेलचेल असते. थोडक्‍यात काय, तर सहलींच्‍या अंतर्गत मौजमजा करण्‍याच्‍या एकमेव हेतूने शाळा अशा प्रकारे ‘रिसॉर्ट’चा पर्याय निवडतात. विद्यार्थ्‍यांना पाण्‍यात खेळायला पाठवायचे आणि आपण मात्र निवांत बसायचे, हेच शिक्षकांना हवे असते. कुठे धावपळ नको किंवा दगदग नको ! स्‍वतःला निवांतपणा मिळावा आणि शाळेचे ‘स्‍टेटस’ही अबाधित रहावे, प्रौढी मिरवता यावी, यादृष्‍टीने अशी ठिकाणे निवडली जातात. यासाठी मुलांकडून भरमसाठ शुल्‍कही आकारले जाते. यामध्‍ये ना पालकांचा विचार केला जात, ना विद्यार्थ्‍यांचा ! पालकांच्‍या खिशाला कात्री लावली जाते. रिसॉर्टसारख्‍या ठिकाणी जाऊन मुले काय शिकणार ?

रिसॉर्ट किंवा एखाद्या पर्यटनस्‍थळी मुले आपल्‍या कुटुंबियांसह जातातच. त्‍यामुळे शाळांनी मुलांना तेथे न नेता त्‍यांच्‍या ज्ञानात भर पडेल, त्‍यांच्‍या नैतिक मूल्‍यांत वृद्धी होईल, अशा प्रकारची त्‍यांचे अनुभव समृद्ध करणारी ठिकाणे निवडायला हवीत. वर्षातून एकदा शाळेसह ही मुले सहलीच्‍या निमित्ताने समाजात वावरतात, हे लक्षात घेता यात शाळेचे मोठे दायित्‍व असते. त्‍यामुळे शाळेने सहली कोणत्‍या ठिकाणी न्‍याव्‍यात, यादृष्‍टीने विचारविनिमय करायला हवा. क्रांतीकारकांशी संबंधित ठिकाण, एखाद्या विशिष्‍ट उत्‍पादनाचा कारखाना, धरणक्षेत्र, निसर्गाशी संबंधित गोष्‍टी उलगडून दाखवणारे ठिकाण, सामाजिक कार्यकर्तृत्‍व गाजवणार्‍या व्‍यक्‍तींशी संबंधित ठिकाणे, विविध शिक्षणसंस्‍था, ग्रंथांचे भांडार असणारी ठिकाणे, टेकडी किंवा गड-दुर्ग अशा स्‍वरूपाची ठिकाणी निवडली गेली पाहिजेत. पूर्वीच्‍या काळी अशाच ठिकाणी शाळांच्‍या सहली जात असत. दिवसभराच्‍या सहलीतून विविध अनुभव घेऊन मुले घरी परतत असत. सहलीविषयीच्‍या गप्‍पागोष्‍टी करायला, तसेच तेथे काय काय पाहिले, हे सांगायला १ आठवडा तरी लागत असे. आता ‘रिसॉर्ट’ला जाऊन काय केले, हे काही घंट्यांतच सांगून पूर्ण होते. शैक्षणिक सहली या खर्‍या अर्थाने संस्‍मरणीय ठरायला हव्‍यात, याचे भान शाळांनी जपावे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.