INC President MallikarjunKharge Jyotirlinga Remark : (म्‍हणे) ‘मी १२ पवित्र ज्‍योतिर्लिंगांपैकी एक आहे !’

काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे संतापजनक विधान

काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

नवी देहली – मी हिंदु आहे, माझे नाव मल्लिकार्जुन खर्गे आहे. १२ पवित्र ज्‍योतिर्लिंगांपैकी मी एक लिंग आहे. माझ्‍या वडिलांनी मला हे नाव दिले, असे विधान  काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १ डिसेंबर या दिवशी देहलीच्‍या रामलीला मैदानात आयोजित जाहीर सभेत केले. या विधानाद्वारे खर्गे यांनी स्‍वतःची तुलना ज्‍योतिर्लिंगांशी केली. यावर भाजपने टीका केली आहे.

खर्गे पुढे म्‍हणाले की,

१. भाजप सरकार देशातील मशिदींचे सर्वेक्षण करून समाजात दुही निर्माण करण्‍याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारच्‍या सर्वेक्षणांना अनुमती देऊन लोक एकजूट होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करत आहेत.  (सर्वेक्षणाला पंतप्रधान मोदी नाही, तर लोकशाहीतील चार स्‍तंभांपैकी एक असणारे न्‍यायालय आदेश देत आहे. हे ठाऊक असतांनाही जाणीवपूर्वक खोटे बोलणारे खर्गे काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आहेत, हे लक्षात घ्‍या ! – संपादक)

२. भाजपाचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मिनार, चार मिनार यांसारख्‍या इमारती उद़्‍ध्‍वस्‍त करणार आहेत का ? कारण या इमारती मुसलमानांनी उभ्‍या केल्‍या आहेत. (हे खर्गे यांना कुणी सांगितले ? या इमारतींविषयी वाद आहे. ही हिंदु राजांनी बनवलेली स्‍थाने आहेत आणि याचे इतिहासात असंख्‍य पुरावे आहेत. ते आता हिंदु पक्षांकडून न्‍यायालयात सादर केले जात आहेत. कुतुब मिनार येथे स्‍वतः पुरातत्‍व विभागाने फलक लावून २७ हिंदु आणि जैन मंदिरे तोडून येथे मशीद बांधल्‍याचे म्‍हटले आहे. हे जगजाहीर असतांना खर्गे खोटे बोलत आहेत. याविषयी हिंदूंनी त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यासाठी तक्रार केली पाहिजे ! – संपादक)

३. देशभर सगळीकडेच सर्वेक्षणे केली जात आहेत. मशिदींखाली मंदिरे शोधण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. त्‍याविरोधात आवाज उठवला जात आहे. वर्ष २०२३ मध्‍ये सरसंघचालक  मोहन भागवत म्‍हणाले होते, ‘केवळ राममंदिर उभारणे हे एवढेच आमचे उद्दीष्‍ट आहे. आपण प्रत्‍येक मशिदींखाली शिवालिंग शोधत बसू नये’; मात्र मोदी सरकारची कृती भागवत यांच्‍या वक्‍तव्‍याच्‍या उलट आहे. (प्रत्‍यक्षात मोदी सरकार यात काहीच करत नसून हिंदूंच्‍या संघटना आणि नेतेच सर्वेक्षणाची न्‍यायालयात मागणी करत आहेत आणि त्‍यांना हा अधिकार लोकशाहीतील राज्‍यघटनेने दिलेला आहे, हे खर्गे यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)

काँग्रेसने क्षमा मागावी ! – भाजप

भाजपचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते शहजाद पूनावाला यांनी एक व्‍हिडिओ प्रसारित करून त्‍याद्वारे म्‍हटले की, हिंदूंच्‍या श्रद्धेचा अपमान करणे, हे काँग्रेस पक्षाचे वैशिष्‍ट्य आहे. काँग्रेसने प्रथम श्रीरामाचा अपमान केला. काँग्रेसने अयोध्‍येतील मंदिरात श्री रामलल्ला यांच्‍या प्राणप्रतिष्‍ठेत झालेल्‍या सोहळ्‍याला ‘नाच-गाना’ असे संबोधले होते. काँग्रेसकडून प्रभु रामाच्‍या अस्‍तित्‍वावर प्रश्‍न उपस्‍थित केले जात आहेत. आता काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भगवान शिवाचा अपमान करत आहेत. खर्गे यांनी स्‍वतःची तुलना १२ ज्‍योतिर्लिंगांशी केली आहे. मला विचारायचे आहे की, काँग्रेस इतर कोणत्‍याही धर्मासाठी अशी टिप्‍पणी करू शकते का ? मतपेढीच्‍या लाभासाठी काँग्रेसची पातळी इतकी खालावली आहे की, ती हिंदूंच्‍या श्रद्धेला सतत दुखावण्‍याचे काम करत आहे. काँग्रेस अध्‍यक्षांनी क्षमा मागायला हवी. जर नाव शिव असेल, तर तुम्‍ही भगवान शिव होऊ शकत नाही. कोट्यवधी लोकांची ज्‍योतिर्लिंगावर श्रद्धा आहे आणि ते स्‍वतःला ज्‍योतिर्लिंग म्‍हणत आहेत. हा हिंदूंचा मोठा अपमान आहे.

(वरील व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

  • स्‍वतःचे नाव ‘मल्लिकार्जुन’ असल्‍यावर स्‍वतःला भगवान शिव समजू लागणारे खर्गे स्‍वतःला हिंदु समजत आहेत, हीच मोठी गोष्‍ट म्‍हणावी लागेल !
  • देशात भगवान शिवाच्‍या मंदिरांवर धर्मांध मुसलमानांकडून होणारी आक्रमणे, काशी येथील ज्ञानवापीवर मुसलमानांनी केलेले अतिक्रमण यांविषयी बोलण्‍याची जाणीव मल्लिकार्जुन खर्गे यांना कधी होत का नाही ? तेव्‍हा ते गप्‍प का बसतात ?