Assam CM On Beef Ban : काँग्रेसने मागणी केल्‍यास आसाममध्‍ये गोमांसावर बंदी घालू !

आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांचे आवाहन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – मी रकीबुल हुसैन यांना सांगू इच्‍छितो की, गोमांसावर बंदी घातली पाहिजे; कारण त्‍यांनी स्‍वतःच ते चुकीचे असल्‍याचे म्‍हटले आहे. ते केवळ मला लिखित स्‍वरूपात देणे आवश्‍यक आहे, असे आवाहन आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांनी काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसैन यांनी केले. गेल्‍या महिन्‍यात झालेल्‍या पोटनिवडणुकीत भाजपच्‍या दिप्‍लू रंजन सरमा यांनी काँग्रेस खासदार रकीबुल यांचा मुलगा तंजील यांचा २४ सहस्र ५०१ मतांनी पराभव केला होता. यानंतर खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपवर काँग्रेसच्‍या पराभवानंतर गोमांस वाटल्‍याचा आरोप केला. त्‍यावर मुख्‍यमंत्री सरमा यांनी वरील प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

मुख्‍यमंत्री सरमा म्‍हणाले की, दु:खाच्‍या वेळी रकीबुल हुसैन यांनी एक चांगली गोष्ट सांगितली की, गोमांस खाणे चुकीचे आहे, नाही का ? विरोधी पक्षाने हे सूत्र उपस्‍थित केल्‍याने मला आनंद झाला आहे. गोमांस वाटणे चुकीचे असल्‍याचे स्‍वतः काँग्रेस खासदारांचे मत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष बुपेन कुमार बोरा यांनी मला पत्र लिहून मागणी केली, तर मी गोमांसावर बंदी घालण्‍यासाठी सिद्ध आहे.

आसाममधील कायदा काय सांगतो ?

‘आसाम कॅटल प्रिझर्वेशन अ‍ॅक्‍ट २०२१’नुसार आसाममध्‍ये गोमांस खाणे बेकायदेशीर नाही; परंतु ज्‍या भागात हिंदु, जैन आणि शीख बहुसंख्‍य आहेत आणि कोणत्‍याही मंदिर किंवा वैष्‍णव मठ परिसरात गोवंश हत्‍या आणि गोमांस विक्री यांवर बंदी आहे.