Kashmiri Hindus Registered Housing Society : काश्मिरी हिंदूंकडून प्रथमच काश्मीर खोर्यात स्थायिक होण्यासाठी सोसायटीची नोंदणी !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार यांच्याकडून अद्याप काश्मीर खोर्यात हिंदूंचे पुनर्वसन करण्यात येत नसल्यामुळे आता याच हिंदूंनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी समुदायाच्या लोकांना खोर्यात पुन्हा कायमस्वरूपी स्थायिक करण्यासाठी मोहीम चालू केली आहे. यासाठी त्यांनी प्रथमच काश्मिरी हिंदूंसाठी एका गृहनिर्माण संकुलाची (सोसायटीची) नोंदणी केली आहे. गेल्या ४ दिवसांत देशभरातील ५०० काश्मिरी हिंदूंनी या सोसायटीशी संपर्क साधला.
Read more:https://t.co/z9OIKzVf3N
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 3, 2024
१. सोसायटीचे म्हणणे आहे की, जी कुटुंबे जोडली जातील, त्यांना भूमी आणि स्वस्तात कर्ज मिळवून देण्यास सोसायटी साहाय्य करणार आहे.
२. या सोसायटीत ९ स्थलांतरित, २ बिगर स्थलांतरित हिंदु आणि एक शीख सदस्य आहेत. यांतील ३ जणांनी नुकतीच केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेऊन गृहनिर्माण सोसायटी स्थापन करत असल्याची माहिती दिली. तसेच काश्मिरी हिंदु कुटुंबांना स्थायिक करण्यासाठी अनुदानावर भूमी देण्याची मागणी केली.
३. काश्मिरी हिंदू असलेले महालदार म्हणाले की, पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात सरकारकडे श्रीनगरमध्ये भूमीची मागणी करण्यात आली आहे. ३५ वर्षांपूर्वी आम्हाला श्रीनगरातून हाकलले होते, तेव्हा सर्वकाही सोडून गेलो होतो. आजही येथे आमची पडकी घरे आहेत. म्हणून आधी आम्हाला येथेच स्थायिक करावे, अशी इच्छा आहे. पंतप्रधान पॅकेजअंतर्गत काश्मिरात काम करणारी काश्मिरी हिंदु दांपत्ये नेहमीच तात्पुरत्या घरांत राहू शकत नाहीत. आता अशी कुटुंबे आमच्याशी जोडली जात आहेत. लवकरच यांची संख्या सहस्रांमध्ये असेल.
केंद्र सरकारकडे आमच्या पुनर्वसनासाठी कोणतेच धोरण नाही ! – काश्मिरी हिंदू
सोसायटीचे सदस्य संजय टिक्कू म्हणाले की, राजकीय पक्ष ३५ वर्षांपासून त्यांच्या घोषणापत्रात आम्हाला स्थान देत आहेत; पण त्यांच्याकडे आमच्या पुनर्वसनासाठी कोणतेही धोरण नाही. आम्ही केंद्रीय मंत्री नित्यानंद यांना पुनर्वसन धोरणाविषयी विचारले असता आमच्याकडे असे कोणतेही धोरण नसल्याचे ते म्हणाले. (हे हिंदूंना अपेक्षित नाही. – संपादक) त्यामुळे आता आम्हीच काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी पुढे आलो आहोत. आम्ही लवकरच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेणार आहे.
वर्ष १९९० मध्ये ६४ सहस्र ८२७ कुटुंबांनी पलायन केले !
गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या काश्मिरात ७७५ काश्मिरी हिंदु कुटुंबे रहातात. वर्ष १९९० मध्ये ६४ सहस्र ८२७ कुटुंबांनी पलायन केले. त्यांपैकी ४३ सहस्र ६१८ कुटुंबे जम्मू आणि १९ सहस्र ३३८ नवी देहली येथे स्थलांतरित झाली. उर्वरित कुटुंबे देशाच्या अन्य राज्यांत रहात आहेत.
संपादकीय भूमिकाजे काम सरकारने करायला हवे, ते आता काश्मिरी हिंदूंना स्वतःच करावे लागणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! |