MahaKumbhMela New District of UP : प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील महाकुंभपर्वाचे क्षेत्र स्‍वतंत्र जिल्‍हा म्‍हणून घोषित

उत्तरप्रदेश सरकारचा निर्णय

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्‍यातील प्रयागराज येथे महाकुंभपर्वासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून स्‍वतंत्र जिल्‍ह्याची घोषणा करण्‍यात आली आहे. ज्‍या परिसरात महाकुंभ आयोजित केला जाणार आहे, ते संपूर्ण क्षेत्राला जिल्‍ह्याचा दर्जा देण्‍यात आला आहे. या जिल्‍ह्याचे नावही ‘महा कुंभ मेळा’ असे ठेवण्‍यात आले आहे. महाकुंभाचे आयोजन आणि त्‍यासंदर्भातल्‍या सर्व गोष्‍टी यांची पूर्तता व्‍यवस्‍थितपणे व्‍हावी, यासाठी हा निर्णय घेण्‍यात आल्‍याचे उत्तरप्रदेश सरकारकडून स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. प्रयागराजचे जिल्‍हाधिकारी रविंद्र कुमार मांदाद यांनी यासंदर्भातील परिपत्रक प्रसारित केले आहे. या जिल्‍ह्याचे पूर्ण व्‍यवस्‍थापन स्‍वतंत्र असणार आहे. १३ जानेवारी २०२५ या दिवसापासून महाकुंभपर्वाला प्रारंभ होणार आहे जो २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालणार आहे.

महाकुंभ व्‍यवस्‍थापन समितीतील प्रमुख कार्यकारी न्‍यायदंडाधिकारी, जिल्‍हाधिकारी आणि अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी पदावर कार्यरत असतील.

पंतप्रधान मोदी घेणार आढावा

महाकुंभाच्‍या व्‍यवस्‍थापनाचा आढावा घेण्‍यासाठी स्‍वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबर या दिवशी उत्तरप्रदेशाचा दौरा करणार आहेत. या वेळी महाकुंभाचे व्‍यवस्‍थापन आणि सुरक्षा तरतुदी यांच्‍या संदर्भात बैठकांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

१० कोटी भाविक येण्‍याची शक्‍यता

मागील महाकुंभपर्वाला काही कोटी भाविकांनी हजेरी लावली होती. या वेळी ही संख्‍या १० कोटींपर्यंत जाण्‍याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्‍यात आला आहे. या काळात सुरक्षाव्‍यवस्‍थेसाठी पोलीस प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. गंगानदीतील स्नासाच्‍या वेळी कोणतीही दुर्घटना टाळण्‍यासाठी पोलिसांसमवेत अंडरवॉटर ड्रोनचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. हे ड्रोन पाण्‍याखाली ३०० मीटरपर्यंतचा माग काढू शकतात.

६ सहस्र हेक्‍टर क्षेत्रफळ

महाकुंभमेळा जिल्‍हा जवळपास ६ सहस्र हेक्‍टर परिसरामध्‍ये उभारण्‍यात येत आहे. त्‍यातील ४ सहस्र हेक्‍टरमध्‍ये प्रत्‍यक्ष कुंभपर्वाचे आयोजन होईल, तर १ सहस्र ९०० हेक्‍टर परिसरामध्‍ये वाहनांच्‍या पार्किंगची व्‍यवस्‍था केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्‍यात आले आहे.

महाकुंभपर्वातील महत्त्वाच्‍या स्नानांचे दिवस

१. १३ जानेवारी २०२५ :  पौष पौर्णिमा
२. १४ जानेवारी २०२५ :  मकर संक्रात
३. २९ जानेवारी २०२५ : मौनी अमावास्‍या (सोमवती)
४. ३ फेब्रुवारी २०२५ : वसंत पंचमी
५. १२ फेब्रुवारी २०२५ : माघी पौर्णिमा
६. २६ फेब्रुवारी २०२५ : महाशिवरात्र

संपर्कासाठीचे क्रमांक  

महाकुंभपर्वाच्‍या अतिरिक्‍त माहितीसाठी प्रयागराज जिल्‍हा व्‍यवस्‍थापनाने संपर्क व्‍यवस्‍था प्रारंभ केली आहे. त्‍यानुसार ०५३२२५०४०११ आणि १५३२२५००७७५ हे २ क्रमांक प्रयागराज जिल्‍हा प्रशासनाच्‍या संकेतस्‍थळावर देण्‍यात आले आहेत.