थोडक्यात महत्वाचे . . .
एकनाथ शिंदे ठाणे येथे परतले !
मुंबई – महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत देहली येथे २८ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीनंतर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा येथील दरे या गावी गेले होते. प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणामुळे विश्रांतीसाठी गावी आलो असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले होते. या विश्रांतीनंतर १ डिसेंबर या दिवशी सायंकाळी एकनाथ शिंदे ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. यानंतर राज्यात सत्तास्थापन करण्याविषयी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुंबई येथे एकत्रित बैठक होणार आहे.
अश्लील चाळे करणार्या वृद्धाच्या विरोधात गुन्हा नोंद !
पनवेल – येथे सुनेच्या ‘डे केअर’मध्ये येणार्या ५ वर्षांच्या मुलीसमवेत सासर्याने (वय ७८ वर्षे) अश्लील चाळे केले. या प्रकरणी वृद्धाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका : अशा विकृत वासनांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
एस्.टी. महामंडळाकडून चालकाचे निलंबन !
गोंदिया येथील ‘शिवशाही’ बसच्या अपघाताचे प्रकरण
गोंदिया – येथे २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या अपघाताप्रकरणी एस्.टी. महामंडळाने चालक प्रणय रायपूरकर याला निलंबित केले. न्यायालयाने त्याची २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या अपघातात ‘शिवशाही’ बस उलटून ११ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २९ प्रवासी घायाळ झाले.
टाकरखेडासंभू (नागपूर) येथील प्रकार !
अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत मधमाशांचे आक्रमण !
नागपूर – येथील टाकरखेडासंभूमधील स्मशानभूमीत अंत्यविधी चालू असतांना अचानक मधमाशांनी आक्रमण केले. त्यामुळे लोक सैरावैरा पळू लागले. या आक्रमणात ३५ ते ४० नागरिकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते घायाळ झाले आहेत. ही घटना ३० नोव्हेंबर या दिवशी दुपारी २.३० वाजता घडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
घाटकोपर येथील फलक दुर्घटना प्रकरण भावेश भिंडे याचा दोषमुक्ततेच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज !
मुंबई – घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर ‘इगो मिडिया’चा मालक भावेश भिंडे याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणात गोवण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.एम्. पाथाडे यांनी भिंडे याच्या अर्जावर पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबर या दिवशी ठेवली आहे.