पुणे महानगरपालिका शहरातील पुतळ्यांचे ‘स्‍थापत्‍य लेखा परीक्षण’ करणार !

‘अल्‍ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्‍ट’ने पडताळणी करणार !

पुणे – सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील राजकोटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्‍या घटनेचे पडसाद महाराष्‍ट्रासह देशामध्‍ये पडले; मात्र शहरातील उभारलेल्‍या पुतळ्‍यांची सद्यःस्‍थिती जाणून घेण्‍यासाठी पुणे महापालिकेने शहरातील सर्व पुतळ्‍यांचे ‘स्‍थापत्‍य लेखा परीक्षण’ (स्‍ट्रक्चरल ऑडिट) करण्‍यास प्रारंभ केला आहे. त्‍यामुळे महापालिकेच्‍या भवन रचना विभागाकडून होत असलेल्‍या पडताळणीतून शहरातील विविध भागांमध्‍ये उभारण्‍यात आलेले पुतळे किती सुरक्षित आहेत, हे कळण्‍यास साहाय्‍य होणार आहे.

शहरामध्‍ये अर्धाकृती आणि पूर्णाकृती असे मिळून ८० पुतळे उभारण्‍यात आले आहेत. या पडताळणीमध्‍ये काही पुतळ्‍यांमध्‍ये किरकोळ डागडुजी करावी लागणार असल्‍याचे, तर काही पुतळे ४० ते ५० वर्षे जुने आहेत. ते वरून चांगले दिसत असले तरी आतून भक्‍कम आहेत कि नाहीत, हे पडताळण्‍यासाठी ‘अल्‍ट्रासॉनिक टोमोग्राफी टेस्‍ट’ केली जाणार आहे, अशी माहिती भवन विभागाचे मुख्‍य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.