सात्त्विकतेची आवड असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उजिरे (कर्नाटक) येथील चि. सच्चिदानंद उदयकुमार (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. सच्चिदानंद उदयकुमार हा या पिढीतील एक आहे !
कार्तिक कृष्ण चतुर्दशी (३०.११.२०२४) या दिवशी चि. सच्चिदानंद उदयकुमार याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
‘मी गर्भारपणी धार्मिक ग्रंथाचे वाचन करत असे. मी नियमित श्लोक आणि श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणत असे.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते १ वर्ष
२ अ १. आम्ही भ्रमणभाषवर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे पाळणागीत लावल्यावर चि. सच्चिदानंद तेे ऐकत झोपत असे.
२ अ २. झोपतांना हातांच्या मुद्रा करणे : ‘सच्चिदानंदला भूक लागावी आणि त्याचे वजन वाढावे’, यासाठी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आम्हाला त्याच्यासाठी नामजपादी उपाय करायला सांगितले होते. त्यांनी आम्हाला आमच्या एका हाताचा तळवा सच्चिदानंदच्या कानाजवळ आणि दुसरा हात त्याच्या अनाहतचक्रावर धरणे, अशी एक मुद्रा करून अन् त्याच्या तोंडासमोर हाताचा तळवा धरणे, अशी दुसरी मुद्रा करून नामजप करायला सांगितला होता. आम्ही त्याप्रमाणे करत होतो. सच्चिदानंद झोपतांना काही वेळा या मुद्रा करत असे.
२ अ ३. सात्त्विकतेची आवड : सच्चिदानंद जन्मापासूनच सात्त्विक वातावरण ओळखत असे. आम्ही रज-तम अधिक असलेल्या ठिकाणी गेल्यावर तो तेथून दूर जाण्याचा पुष्कळ हट्ट करत असे. आम्ही तेथून बाहेर पडताच तो शांत होत असे. मी त्याला दूध देतांना नामजप करत असल्यासच तो दूध पीत असे.
२ अ ४. नामजपादी उपाय पूर्ण झाल्यावर झोपणे : आमचे त्याच्यासाठी नामजपादी उपाय पूर्ण करून झाल्यावरच तो प्रतिदिन झोपत असे. मी त्याच्यासाठी नामजपादी उपाय करतांना ‘मलाही चैतन्य मिळते’, असे मला जाणवत असे.
२ आ. वय १ ते २ वर्षे
२ आ १. प्रेमभाव : तो त्याच्या लहान बहिणीवर प्रेम करतो आणि तिची काळजी घेतो. ती पाळण्यात असेल, तर तो तिला झोके देतो. तो तिला खेळणी देतो. आम्ही तिचे लाड केल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो.
२ आ २. २०.६.२०२४ या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांसाठी संतांचे मार्गदर्शन होते. तेव्हा सच्चिदानंद खेळत असतांना धावत आला आणि त्याने हात जोडून प्रार्थना केली अन् साष्टांग नमस्कार केला.
२ आ ३. तो ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातो. तेव्हा त्याला पुष्कळ आनंद होतो.
२ आ ४. देवाची आवड : आम्ही सकाळी देवपूजा करतांना आणि सायंकाळी आरती करतांना तो घंटा वाजवतो. तो देवाला आणि तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालून नमस्कार करतो. तो झाडाची फुले काढून आणतो आणि देवांना वहातो. तो सर्वांना प्रसाद देतो. तो भजन किंवा देवाचे गाणे ऐकतांना आनंदाने नाचतो. तो मधून मधून देवघरासमोर साष्टांग नमस्कार घालतो.
२ आ ५. श्रीरामाचा नामजप ऐकायला आवडणे : आम्ही भ्रमणभाषवर लावलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप ऐकत तो झोपतो. आम्ही जयघोष केल्यावर तो दोन्ही हात वर करून ‘जय’ असे म्हणतो. आम्ही मोठ्याने नामजप केल्यावर तो टाळ्या वाजवतो.
२ आ ६. सत्संगाची आवड : पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) यांचा प्रतिदिन सकाळी ७ वाजता साधकांसाठी भावसत्संग ऑनलाईन असतो. तेव्हा सच्चिदानंद सत्संग चालू होण्यापूर्वी झोपेतून उठून पूर्ण सत्संग ऐकत असे.
३. सच्चिदानंदच्या संदर्भातील अनुभूती
सच्चिदानंदला स्नान घातल्यावर काही वेळा माझ्या हाताला चंदनाचा सुगंध येतो. काही वेळा त्याच्या शरिरावर दैवी कण आढळतात.’
– सौ. प्रेमा उदयकुमार (चि. सच्चिदानंदची आई), उजिरे, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (२०.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |