राजकारण्यांची अश्लाघ्य भाषा महाराष्ट्रासाठी अशोभनीय !
१. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक प्रचारात अश्लाघ्य भाषेचा वापर
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राजकारण किती खालच्या स्तरावर गेले, हे अमरावतीच्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यावरील झालेल्या आक्रमणाने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या जागतिक मान्यतेच्या नेत्यावर एकेरी भाष्य केले गेले. ते पहाता मराठीचा अभिजात दर्जाचा स्वाभिमान बाळगावा कि लाजेने मान खाली घालावी, हे कळेनासे झाले. निवडणूक प्रचारात वय, अनुभव, पद, पात्रता, त्याग आणि अभ्यास यांचा सारासार कुठलाही विचार न करता अगदी तरुण उमेदवाराकडूनही अपशब्दांचा वापर केला गेला, तेव्हा ‘अमृता तेहि पैजा जिंके’ असणारी हीच आमची मराठी, असे प्रश्नचिन्ह मनात उभे राहिल्यास आश्चर्य नाही. हे सर्व होण्याचे कारण जीवनातील धर्माचे स्थान नष्ट होऊन धर्माच्या नावाखाली चालू असलेला गलिच्छ व्यवहार हेच होय. या वेळी ‘राजकारणाला धर्म असावा आणि धर्माला राजकीय दृष्टी असावी’, असे जे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत, त्याची वर्तमानात किती नितांत आवश्यकता आहे, याची जाणीव झाल्याविना राहिली नाही. निवडणूक म्हटली की, आश्वासने, आव्हाने, टीका, विधाने या गोेष्टी होणारच; पण ती करतांना नागरिकांच्या हितासाठी ‘आमच्या पक्षाने काय केले ? आणि पुढे आम्ही काय करणार ?’, हे सांगण्यापेक्षा इतरांवर टीका करण्यात आली. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा विरोधकांची रेषा लहान कशी आहे आणि त्यामुळे आपणच सत्तेसाठी कसे पात्र आहोत, हाच प्रयत्न सर्वाधिक झाला. प्रत्येक पक्षाचे घोषणापत्र शाळेतील मूल्य शिक्षणासारखे केवळ देखावे ठरले. उखाळे पाखाळे कौटुंबिक स्तरावरील टीका, उद्धट अर्वाच्य भाषा, आचकट विचकट हावभाव, हे सर्व किळसवाणे प्रकार पाहून खरच हे सत्ता सांभाळण्यास योग्य आहेत का ?, असा प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण होऊ शकतो.
२. योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ घोषणा
(टीप : ‘बटेंगे तो कटेंगे’, म्हणजे विभागले गेलो, तर कापले जाऊ आणि ‘एक है तो सेफ है’, म्हणजे एकत्र आहोत, तर सुरक्षित राहू)
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री तथा भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी खरोखरच त्यांच्या राज्यातील गुंडशाही आणि झुंडशाही यांना नियंत्रणात आणून जनजीवनात बर्याच अंशी शांतता निर्माण केली. संन्यासी हा केवळ समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी जगतो, हे योगींनी दाखवून दिले. या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मुसलमान बहुसंख्य भागात ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिली. याचा अर्थ मुसलमान समाजाच्या ध्यानी आला; पण निवडणूक लढवणार्या पक्षनेत्यांच्या लक्षात येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. हे राष्ट्र प्राचीन आहे; पण या सार्या विविधतेत एकतेच जोडणारे या राष्ट्राचे सत्त्व एक आहे; म्हणूनच दक्षिणेतील शंकराचार्य उत्तरेत आणि उत्तरेतील काशी विश्वनाथ दक्षिणेत पूजनीय मानला जातो. या एकसूत्रात सर्वांना बांधून ठेवणारी सनातन वैदिक संस्कृती ही जगातील लोकांना आश्चर्यचकित करणारी आहे.
भारतातील प्राचीन कला, साहित्य, काव्य, संस्कार, ज्ञान, विज्ञान, साधना आणि उपासना यांमुळे प्रभावित होऊन ‘नासा’सारखे विज्ञान केंद्रही वर्तमानात त्याचा अभ्यास करत आहे. या विविधतेतील एक भाग भारतीय वर्णवस्थेचे जातीव्यवस्थेत झालेले रूपांतर होय. विविध व्यवसाय आणि व्यवहार यांना धरून या राष्ट्रात निर्माण झालेली जातीव्यवस्था एक प्राचीन सामाजिक व्यवस्था होती. ती वर्तमानात किती उपयोगाची हा अभ्यासाचा विषय आहे; परंतु आपला देश विविध जातींमध्ये विभागला गेलेला आहे. हा देश प्राचीन काळात एकसंघ होता. जेव्हा या प्राचीन एकसंघतेला ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’, या विषारी विचाराचा स्पर्श झाला. जेव्हा जेव्हा हे राष्ट्र परस्परात कधी भाषा, तर कधी प्रांत, तर कधी जात, तर कधी आधीच्या कारणाने विभागले गेले, तेव्हा तेव्हा या राष्ट्रात गुलामी पारतंत्र परवश्यतेचा सामना करावा लागला. आक्रमकांनी आपल्यात कलह निर्माण करूनच या राष्ट्रावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नांचा परिणाम आपली कला, साहित्य, उपासना आणि धर्मस्थळे यांचा विध्वंस होण्यात झाला. त्याचे पुरावे पुण्यात आजही दिसतात. त्यामुळे हे राष्ट्र अबाधित ठेवायचे असेल, तर आपापसांतील भेदाभेद बाजूला ठेवून ‘एक है तो सेफ है’ मनात ठेवणे आवश्यक आहे.
राष्ट्राच्या सीमेवर चीन डोळे वटारून बसला आहे. सध्या जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अशा स्थितीत आपले राष्ट्र सुरक्षित राखावयाचे असेल, तर जात-पात पंथ आधी सारे भेदाभेद बाजूला सारून हिंदूंनी एक होणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात देशात एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात ठेवून ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा उच्चार संन्यासाने केला असेल, तर त्यात चूक ते काय ? त्यामुळे त्याचा विपर्यास करता कामा नये. हे राष्ट्र महत्त्वाचे आहे.
३. भारत हिंदु राष्ट्र आहे आणि राहील !
हिंदु राष्ट्राचा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. हे राष्ट्र पूर्वीही हिंदूंचेच होते, आताही हिंदूंचेच आहे आणि पुढेही हिंदूंचेच रहाणार आहे; कारण जगात या राष्ट्राची ओळखच हिंदुस्थान अशी आहे. हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याची आवश्यकता नाही; कारण जे मुळात आहे, त्याची पुनश्च घोषणा करण्याची आवश्यकता काय ? येथील इतिहासाचे नावच ‘हिंदु’ आहे. अनेक तत्त्वज्ञांनी हा विचार वारंवार मांडला. असे असतांना सत्तेची लालसा असणार्यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द वापरताच असंख्य विंचू चावल्याच्या वेदना का होतात, हेच कळत नाही.
४. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांनी मनोज जरांगे यांना हीन भाषा वापरण्यापासून थांबवणे आवश्यक !
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आंदोलन उभे झाले. मराठ्यांना आरक्षण मिळणे इथपर्यंत विचारसरणी ठीक आहे; पण त्यासाठी केवळ भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करून त्यांच्यावर वारंवार एकेरी भाषेत टीकाटिपणी करणे, हे कशाचे द्योतक आहे ? जरांगे असे बोलत असतांना त्यांना महाराष्ट्रात शरद पवारांसारखे ज्येष्ठ धुरंदर नेतृत्व थांबवत का नाही ? राज्यघटनेने हक्कासाठी आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे खरे; पण ते करतांना भाषा कशी असावी, याच्याही काही मर्यादा आहेत. मागण्यांसाठी रक्तपिपासूपणा धारण करावयास लागलो किंवा मारून टाकण्याची भाषा बोलावयास लागलो, तर खरच हा महाराष्ट्र सुशिक्षितांचा आहे, असे कुणास वाटेल ? या सर्व गोष्टींचा विचार करून दूरदृष्टीने योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ची गर्जना केली, तर त्यात चूक काय ?’
– प्रा. श्याम मो. देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, वर्धा.