कुणाचे कुठे चुकते ?

प्रतिकात्मक छायाचित्र

शिरस्‍त्राणाविना दुचाकी चालवल्‍याच्‍या प्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने १० सहस्र वाहनचालकांवर कारवाई केली. यातून ४४ लाख ५७ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई ‘प्रादेशिक परिवहन विभागा’च्‍या (‘आर्.टी.ओ.’च्‍या) ‘वायुवेग पथका’ने १ एप्रिल ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत केली. एवढ्या कालावधीतील ही आकडेवारी गंभीर आहे. ही कारवाई विभागीय आयुक्‍तांनी आदेश दिल्‍यानंतर प्रशासनाने शिरस्‍त्राण न घालता दुचाकी घेऊन सरकारी कार्यालयांत येणार्‍यांवर कारवाई केली आहे. यावरून संपूर्ण शहरात दुचाकीवर शिरस्‍त्राण न घालता फिरणारे किती जण असतील, याची संख्‍याच मोजता येणार नाही !

दुसर्‍या टप्‍प्‍यात उर्वरित सर्वच शासकीय कार्यालयांत शिरस्‍त्राण सक्‍तीची मोहीम राबवली जाणार आहे, असे आयुक्‍तांनी सांगितलेले आहे. हे वाचल्‍यानंतर आपल्‍या देशात जनतेला किती शिस्‍त आहे, हे लक्षात येते. प्रत्‍येक काही दिवसांनी दुचाकीवरून शिरस्‍त्राण न घालता फिरणार्‍यांविषयीच्‍या बातम्‍या वाचायला मिळतात. प्रत्‍यक्षात शिरस्‍त्राणसक्‍ती ही मोहीम अनेक वर्षांपासून चालू आहे. वाहतूक पोलीस रस्‍त्‍यावर असतांनाही त्‍यांच्‍या समोरून दुचाकीचालक विनाशिरस्‍त्राण फिरत असतात; परंतु काही जणांना पकडले जाते, तर काहींना मोकाट सोडले जाते. रस्‍त्‍यावर अजूनही सर्वजण शिरस्‍त्राण घालून दुचाकी चालवतांना दिसत नाहीत, हे गंभीर आहे. प्रत्‍यक्षात ‘शिरस्‍त्राणसक्‍ती ही प्रत्‍येकाचे आरोग्‍य चांगले रहावे’, यासाठी आहे. तरीही याविषयीची संवेदनशीलता अजूनही नागरिकांमध्‍ये निर्माण होत नाही, हे चिंताजनक आहे.

यामध्‍ये शिस्‍त लावणारे शासनकर्ते अल्‍प पडतात कि जनतेला स्‍वतःच्‍या जिवाची पर्वा नाही ? याचे उत्तर शोधणे अवघड आहे. ‘जनतेला स्‍वतःच्‍या जिवाची पर्वा नाही’, असा जरी विचार केला, तरी शासनकर्त्‍यांनी जनतेसाठी जे आवश्‍यक आहे, तेच त्‍यांच्‍याकडून करवून घ्‍यायला हवे. अशी तीव्र इच्‍छाशक्‍ती शासनकर्त्‍यांनी ठेवली, तरच देशातील जनतेला शिस्‍त लागेल. अन्‍यथा शासनाने आदेश काढायचे, जनतेने ते डावलायचे किंवा दंड भरून मोकळे व्‍हायचे. थोडक्‍यात काय, तर ‘पहिले पाढे पंच्‍चावन्‍न’ असाच प्रकार होतो. जनतेला कसलेच सुवेरसुतक नाही, असेच वाटते. हे चित्र असेच राहिले, तर देशाचा विकास होणार का ?

येथे केवळ शिरस्‍त्राण वापरणे हा विषय नसून गुटखा बंदी, गोवंश हत्‍याबंदी असे अनेक विषयांवरील कायदे कागदावर आले आहेत; परंतु प्रत्‍यक्षात स्‍थिती वेगळीच आहे. या सर्व कायद्यांची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही. त्‍यामुळे कुणाचे कुठे चुकते ? हा प्रश्‍न अनुत्तरित रहातो.

– वैद्या (सुश्री) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.