शरीर म्‍हणजे तात्‍पुरते रहाण्‍याचे विश्रांतीभवन (‘लॉज’); जीवात्‍म्‍याचे खरे घर भगवंतच !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज) हुबळीस गेले असता एका विश्रांतीभवनचे (‘लॉजचे’) मालक दर्शनास आले. ते ब्रह्मानंद महाराज यांचे शिष्‍य होते. श्रीमहाराज त्‍यांना म्‍हणाले, ‘आपल्‍या गुरूंना न विसरता भगवंताच्‍या नामात रहावे.’ तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘मला फार काम असते. नामस्‍मरण करण्‍यास मला वेळच मिळत नाही.’ श्रीमहाराजांनी त्‍यांना विचारले, ‘तुमच्‍या कामाच्‍या आड न येता करण्‍यासारखे एखादे साधन सांगितले तर ते कराल काय ?’ ‘हो, अवश्‍य करीन’, असे त्‍यांनी आश्‍वासन दिल्‍यावर श्रीमहाराज म्‍हणाले, ‘तुम्‍ही मालक म्‍हणून सतत पैसे घेण्‍याच्‍या कक्षावर असता. लॉजमध्‍ये रहाणारे लोक जातांना आपली बिले (देयके) देऊन जातात. १०-१५ दिवस जरी ते लॉजमध्‍ये राहिले, तरी सोडून जातांना त्‍यांना अजिबात वाईट वाटत नाही; उलट ‘आपण आपल्‍या घरी चाललो’, याचा आनंद त्‍यांना होतो. आपण ज्‍या शरिरात रहातो, तेसुद्धा एक विश्रांतीभवनच आहे. ते सोडतांना आपल्‍याला आनंद व्‍हायला पाहिजे. यासाठी ‘हे शरीर माझे घर नसून माझे खरे घर भगवंतापाशीच आहे’, अशी जाणीव सतत रहाणे आवश्‍यक असते. ज्‍याप्रमाणे ग्राहक विश्रांतीभवन (लॉज) सोडतांना ते आनंदात सोडतो, त्‍याचप्रमाणे हा देह सोडतांना मी तो आनंदात सोडला पाहिजे, याची सारखी आठवण ठेवावी. असे केल्‍याने बसल्‍या ठिकाणी आपोआप साधना घडेल.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)