आध्यात्मिक स्तरावर राहून साधकांना अविरत मार्गदर्शन करणार्या पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा पू. शिवाजी वटकर यांच्याशी झालेला संवादरूपी सत्संग !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी देवद आश्रमात ११ वर्षे वास्तव्यास आहे. गुरुकृपेने आश्रमातील साधकांना साधनेसाठी आधार म्हणून पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. ताई) लाभलेल्या आहेत. त्या साधना आणि सेवा यांविषयी साधकांना मार्गदर्शन करतात. २७.१०.२०२० या दिवशी रात्री ८ वाजता कसलेही नियोजन नसतांना अकस्मात् आमची भेट झाली. ‘त्यांना ५ – १० मिनिटे वेळ आहे का ?’, असे विचारून मी त्यांच्याशी बोलू लागलो. आम्ही २ घंट्यांपेक्षा अधिक वेळ संवादरूपी सत्संगात होतो. तेव्हा ‘मला शिकण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी हे ईश्वरी नियोजन होते’, असे वाटले. पू. ताईंची चैतन्यमय वाणी ऐकून मला जे थोडेफार आत्मसात् झाले, ते मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करत आहे. २७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी या सत्संगाचा पहिला भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/857998.html
४. पू. ताईंना देवाने साधकांची साधना आणि सेवेतील अडचणी अचूकतेने अन् नेमकेपणाने दाखवणे अन् त्या सोडवण्यास साहाय्य करणे
पू. वटकर : तुमच्याकडे अभ्यास आणि मार्गदर्शन करणे अशा अनेक सेवा असतात. तुमचे वय लहान आहे. तुम्हाला संसार, व्यवहार, चाकरी, लोकांना हाताळणे, हे ठाऊक नाही. कठीण प्रसंगात माझ्यासारख्या व्यक्तीलाही ताण येतो. तुमच्याकडे आलेल्या कठीण प्रसंगात व्यापकता आणि विभिन्नता असते, तरीही तुम्ही कसे हाताळता ?
पू. ताई : देव मला अचूकतेने आणि नेमकेपणाने सांगतो. आधी तसे नसायचे, उदा. आश्रमातील एक धुलाई यंत्र नादुरुस्त होते. ते एकाने दुरुस्त केले. त्यातील ‘स्पीनरच्या ड्रम’मध्ये (कपडे सुकवायच्या भागात) काही वस्तू मिळाल्या. देखभाल करणारा साधक सांगत होता, ‘‘यंत्र वापरणार्या साधकांचीच चूक आहे’’; पण मला देव ‘देखभाल करणार्या साधकाचीच चूक आहे’, असे सांगत होता. नंतर देखभाल करणारा साधक म्हणाला, ‘‘कपडे ‘स्पीन’ होतांना कपड्यांवर जाळी ठेवत नाहीत; म्हणून यंत्र बिघडलेे.’’ मी आणखी विचारणा केल्यावर ‘देखभाल विभागाने ती जाळी पुरवली नव्हती’, असे लक्षात आले. हे मला तसे कळणे शक्य नव्हते; पण देवाने मला अचूकपणे सांगितले. नाहीतर वेळ गेला असता, तसेच ‘ज्यांची मूळ चूक आहे, ते सुटले असते आणि ज्यांची चूक नाही त्यांच्यावर अन्याय झाला असता.’
पू. वटकर : अनेक साधकांपैकी कुठल्या साधकाची सेवा आणि साधना नीट होत नाही, हे तुम्ही कसे ओळखता ?
पू. ताई : एका विभागातील सत्संगात मार्गदर्शन चालू होते. त्या वेळी देव सुचवत होता की, एका लहान साधिकेची साधना आणि सेवा चांगली होत नाही. इतर साधकांना त्याविषयी विचारल्यावर साधक सांगत नव्हते. २ – ३ वेळा विचारल्यावर एका साधकाने सांगितले की, तिचा वेळ वाया जातो. आपल्याला दुसर्यांनी सांगितल्याविना काही लक्षात येत नाही आणि इथे कुणी सांगतही नव्हते; पण देव सुचवत होता. त्यानंतर मी साधकांकडून या सूत्राविषयी लिहून मागवले. त्या साधिकेला तिच्या चुकांची जाणीव करून दिली. तेव्हा साधिकेच्या साधनेची प्रक्रिया पूर्ण झाली.
पू. वटकर : तुमच्या ठिकाणी दुसरे कुणी असते, तर मानसिक आणि भावनिक स्तरावर हाताळले असते. साधिका लहान आहे; म्हणून सोडून दिले असते. तुम्ही ते सर्व आध्यात्मिक स्तरावर हाताळले. तसे केले नसते, तर त्या साधिकेच्या आणि तिच्या समवेत सेवा करणार्या साधकांच्या साधनेची हानी होत राहिली असती.
पू. ताई : मला देवाची कमाल वाटते. माझ्याकडे एखादे सूत्र आल्यावर ‘याच्यात काहीतरी त्रुटी आहे’, असा विचार येतो. मग मी त्याचा अभ्यास करते आणि ते परिपूर्ण होण्यासाठी देव प्रयत्न करून घेतो.
५. पू. ताईंशी संवाद करत असतांना सूक्ष्मातून अडथळे येणे
पू. ताई : आता खोलीत अकस्मात् उकडायला लागले. आपण पंखा लावूया. आतापर्यंत थंडावा वाटत होता. आता उष्णता जाणवते, म्हणजे सूक्ष्मातून युद्ध चालू आहे. ‘युद्धाची स्पंदने, युद्धाची सामसुमता’, असे मला जाणवायला लागले आहे. भावी काळातील महायुद्ध हा आपल्या (सत्-असत्च्या) चालू झालेल्या युद्धाचा शेवट आहे. हे झाले की, हिंदु राष्ट्र येणार. तिसरे महायुद्ध ही हिंदु राष्ट्राची नांदी आहे.
६. पू. ताईंची सेवा अधिकतम आध्यात्मिक आणि सूक्ष्म स्तरावर होत असणे
पू. वटकर : प्रत्येक घटनेत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक घटक असतात. ‘आता तुमच्या सेवेचा भाग अधिकतम आध्यात्मिक आणि सूक्ष्म स्तरावर होत चालला आहे’, असे वाटते.
पू. ताई : मला असे लक्षात आले की, सेवेमध्ये आपोआप एक पकड (नियंत्रण) येते. मी आणि सेवा एकरूप होतो. हे सर्व परात्पर गुरु डॉक्टर करून घेतात आणि आम्ही गुरुकार्याला पूरक होतो. ‘मला फारशी शक्ती व्यय करावी लागत नाही’, हे मलाही जाणवते. आपण शरिराने सेवा फार करतो, असे नाही; पण ‘देवच सूक्ष्मातून करून घेतो’, असे वाटते. त्याची फलनिष्पत्तीही चांगली असते. माझ्या सहसाधकांचीही फलनिष्पत्ती वाढली आहे. त्यांची प्रगल्भता, कार्यक्षमता आणि सहजता वाढली आहे. त्यामुळे मला इतर प्रश्नांकडे लक्ष देता येते.
पू. वटकर : तुमचा वेळ वाचल्यामुळे हाती घेतलेल्या सेवेत आणखी काहीतरी चांगले करता येऊन दुसरी महत्त्वाची सेवा करता येत असेल.
पू. ताई : सेवेची व्याप्ती वाढल्याने मला अन्य ठिकाणी लक्ष देता येते. सेवेचा अभ्यास करून तिची घडी बसवता येत आहे. यात आनंदही आहे.
(क्रमशः)
– पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.११.२०२०)
या लेखाचा यापुढील भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/859821.html
|