बांगलादेशामधील हिंदूंना संरक्षण द्या !

सातारा येथे सकल हिंदु समाजाची आंदोलन आणि निषेध यांद्वारे मागणी !

  • बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंवरील आक्रमणांविषयी कुणीही मानवाधिकारी संघटना तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्‍या !
  • अशी मागणी का करावी लागते ?

सातारा, १ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशामधील हिंदूंच्‍या होणार्‍या हत्‍या थांबवण्‍यासाठी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी सातारा येथील ‘सकल हिंदु समाजा’ने निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे केली आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने येथील शिवतीर्थावर आंदोलन करण्‍यात आले. आंदोलनानंतर शिवतीर्थ ते जिल्‍हाधिकारी कार्यालय अशी निषेध यात्रा काढण्‍यात आली. नंतर शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन दिले. या वेळी विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदू एकता आंदोलन, हिंदु महासभा, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आदी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, तसेच भाजप, शिवसेना या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्‍येने उपस्‍थित होते.

निवेदनामध्‍ये म्‍हटले आहे की, बांगलादेशामध्‍ये सत्ता परिवर्तन झाल्‍यानंतर हिंदु नागरिकांच्‍या हत्‍या मोठ्या प्रमाणात होत आहेत. महिला, मुली यांवर अत्‍याचार होत आहेत. युवकांना मारहाण होत आहे. हिंदूंना मालमत्ता आणि घरे सोडून पळून जावे लागत आहे. बांगलादेशमध्‍ये ‘इस्‍कॉन’ या आध्‍यात्‍मिक संस्‍थेने बांगलादेशी नागरिकांना अन्‍न आणि पाणी पुरवले, त्‍या संस्‍थेचे प्रमुख स्‍वामी चिन्‍मय कृष्‍णदास यांना अटक करून त्‍यांच्‍यावर देशद्रोहाचा खटला भरण्‍यात आला आहे, ‘इस्‍कॉन’ संस्‍थेची मान्‍यता रहित करण्‍याचे काम चालू आहे. भारत सरकारने बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांविषयी लक्ष घालून तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे.