Shimla Mosque Demolition Issue :  मुसलमानांची याचिका फेटाळत जिल्‍हा न्‍यायालयाने मशीद पाडण्‍याचा आदेश ठेवला कायम !

  • शिमला (हिमाचल प्रदेश) येथील संजौली भागातील मशिदीचे अवैध ३ मजले पाडण्‍याचे प्रकरण

  • २० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्‍याचा उच्‍च न्‍यायालयाने आधीच दिला आहे आदेश !

शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील संजौली भागातील मशिदीवरील ३ अवैध मजले पाडण्‍याच्‍या शिमला महापालिका आयुक्‍तांच्‍या आदेशाला मुसलमान पक्षाने जिल्‍हा न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. ‘ऑल हिमाचल मुस्‍लिम वेल्‍फेअर असोसिएशन’ची ही याचिका न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे. या वेळी न्‍यायालयाने पालिका आयुक्‍तांचा निर्णय कायम ठेवला आहे.

१. जिल्‍हा न्‍यायालयाच्‍या निर्णयानंतर आता मशिदीवरील ३ मजले २० डिसेंबरपर्यंत हटवावे लागणार आहेत. तसा आदेशच हिमाचल प्रदेश उच्‍च न्‍यायालयाने दिला होता.

२. सद्य:स्‍थिती अशी आहे की, मशिदीच्‍या एका मजल्‍यावरील छत आणि भिंती हटवण्‍यात आल्‍या आहेत. वरील ३ मजले पाडण्‍याचे काम मशीद समिती स्‍वखर्चाने करणार आहे.

३. उच्‍च न्‍यायालयाने ८ आठवड्यांत प्रकरण निकाली काढण्‍याचा आदेश दिला आहे.

४. मशिदीच्‍या अवैध मजल्‍यांच्‍या विरुद्ध स्‍थानिक महापालिका न्‍यायालयात वर्ष २०१० पासूनच प्रकरण चालू होते. सप्‍टेंबर २०२४ मध्‍ये हिंदूंनी मशिदीच्‍या विरोधात मोठे आंदोलन उभे केले. याचे पडसाद संपूर्ण राज्‍यात उमटले आणि शिमल्‍यानंतर सोलन, मंडी, कुल्लू, सिरमौर आदी जिल्‍ह्यांतील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी तेथील अवैध मशिदींच्‍या विरुद्धही जोरदार निदर्शने केली आणि तेथील मशिदी पाडण्‍याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

मुसलमान पक्ष आता हे प्रकरण घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयात गेले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! मुळात अवैध बांधकामाला समर्थन देणार्‍यांच्‍या विरुद्धही आता कठोर कारवाई झाली पाहिजे !