सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालकांची वसुली लावा ! – सदाभाऊ खोत, आमदार

बँकेवर प्रशासक नेमावा !

सांगली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकर्‍यांऐवजी संचालकांच्या हितसंबंधितांना कर्ज देण्यात संचालक आणि अधिकारी यांनी धन्यता मानली आहे. आजपर्यंत त्यांना अनेकांनी पाठीशी घातले असून यापुढे त्यांच्याकडून वसुली केली जावी, तसेच बँकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी नवीन मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे दिली.

ते म्हणाले की, कर्जप्रकरणे, नोकरभरतीसहित विविध प्रकरणांमध्ये अपव्यवहार झाला असून प्रकरण दडपण्यासाठी राजकीय बळाचा वापर केला आहे. याविषयी आपण गंभीर असून शेतकरी, कार्यकर्ते प्रतिदिन अन्यायाची माहिती पाठवत आहेत. यापूर्वीचे शासकीय अहवालही या संचालकांचे अपव्यवहार दाखवणारे आहेत. नव्या शासनाने संचालकांना कारागृहाची हवा घडवावी.