सृष्टीची निर्मिती होण्यामागील आध्यात्मिक कारण आणि त्यामागील सूक्ष्म प्रक्रिया
‘सृष्टीची निर्मिती का झाली ? ती कशी सिद्ध झाली ?’, असे प्रश्न जिज्ञासूंना पडतात. त्याविषयी देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून मला ज्ञान प्राप्त झाले. ते पुढे दिले आहे.
१. ईश्वराला सृष्टीच्या निर्मितीची इच्छा नसण्यामागील कारण
ईश्वर अनंतात अस्तित्वरूपाने व्याप्त आहे. त्यामुळे त्याला विशिष्ट कार्य नाही. परिणामी ईश्वराला स्वतःला अनेक रूपांत पहाण्याची किंवा सृष्टीच्या उत्पत्तीची इच्छा होत नाही.
२. सृष्टी निर्माण होण्याचे प्रमुख कारण
अनादि प्रकृतीच्या गुणधर्मांनुसार सृष्टीची ‘उत्पत्ती’, ‘स्थिती’ आणि ‘लय’ होत असते. त्याचे सविस्तर विश्लेषण पुढे दिले आहे.
३. सृष्टीच्या निर्मितीतील टप्पे
३ अ. परमेश्वर ‘निर्गुण’ आहे. त्यानंतर ईश्वर आहे. ईश्वराचे दोन अंग एक ‘सगुण’ आणि दुसरे ‘निर्गुण’. सगुणात ‘अनादि शक्ती’ आहे. तिच्यात ‘अनादि प्रकृतीचा’ वास असतो. अनादि प्रकृतीत ‘सत्त्व’, ‘रज’ आणि ‘तम’ हे त्रिगुण आहेत.
३ आ. त्रिगुणांचे गुणधर्म : सत्त्वामध्ये ‘ज्ञान’ आणि ‘स्थैर्य’ असते. रजामुळे कार्य घडते आणि त्याला गती प्राप्त होते. तमामुळे ‘लय’ किंवा ‘नाश’ होतो.
३ इ. त्रिगुणांचे एकत्रीकरण आणि त्यातून पंचतत्त्वांची निर्मिती होणे : अनादि प्रकृतीचे कार्य अनादि काळापासून आणि अव्याहतपणे चालू असते. त्याप्रमाणे त्रिगुणांचे कार्यही अखंड चालू असते. ‘सत्त्व’, ‘रज’ आणि ‘तम’ यांचा संयोग-वियोग त्यांच्यातील गुणधर्मांमुळे होतो. त्या वेळी त्यांतील असंख्य तत्त्वांचाही संयोग-वियोग होतो. ही तत्त्वे सूक्ष्म कणांच्या स्वरूपात असतात. त्रिगुणांचा ‘संयोग’ आणि ‘वियोग’ यांतून ‘पृथ्वी’, ‘आप’, ‘तेज’, ‘वायु’ आणि ‘आकाश’ या पंचतत्त्वांची निर्मिती होते.
३ ई. पंचतत्त्वांच्या मिश्रणांतून सृष्टीची उत्पत्ती होणे : पंचतत्त्वांतील सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म कणांचा संयोग आणि वियोग यांतून सृष्टीची निर्मिती होते. हा कणशास्त्राचा विषय आहे.
४. ‘अनादि प्रकृती’चे गुणधर्म
अ. अनादि प्रकृतीला ‘सत्त्व’ गुणामुळे सृष्टीच्या उत्पत्तीची प्रेरणा होते, तेव्हा प्रकृतीतील शक्तीचे प्रकटीकरण होते. ‘रज’ गुणामुळे शक्तीतून सृष्टीच्या उत्पत्तीचे कार्य घडते आणि त्याला गतीमानता येते. प्रगट झालेल्या शक्तीचा, म्हणजे सृष्टीचा काही काळाने ‘तम’ गुणामुळे र्हास होतो. परिणामी सृष्टीचा ‘लय’ होतो.
आ. प्रकृतीचे कार्य अनादि काळापासून चालू असल्याने तिला ‘अनादि प्रकृती’, असे म्हणतात.
इ. प्रकृतीचे अखंड कार्य आहे. त्यामुळे सृष्टीची ‘उत्पत्ती’, ‘स्थिती’ आणि ‘लय’, हे अनंत काळापासून चालू आहेत; परंतु हे भासमान असल्याने तिला ‘प्रकृती नाट्य’, असे म्हणतात.
ई. प्रकृती तिच्या गुणधर्मांनुसार सृष्टीला चालवत असते. या प्रक्रियेला ‘प्रकृती नर्तन’, असे म्हणतात.
५. ईश्वर आणि ‘अनादि प्रकृती’ यांचा परस्पराशी संबंध
ईश्वर अनंत स्वरूपात व्याप्त आहे. त्यामुळे त्याला विशिष्ट कार्य नाही. त्याचे एक ‘लघु अंग’, म्हणजे लहानसे अंग ‘अनादि प्रकृती’ आहे. अनादि प्रकृती तिच्या गुणधर्मांनुसार अव्याहतपणे कार्य करत असते. त्यामुळे अनंत काळापासून सृष्टीची ‘उत्पत्ती’, ‘स्थिती’ आणि ‘लय’ यांचे कार्य घडते.
५ अ. ईश्वर प्रकृतीच्या कार्यात हस्तक्षेप कधी करतो ?
१. ज्या जिवांना ‘प्रकृती ही भासमान आहे. त्यात केवळ सुख आणि दुःख आहे. यात न अडकता मला आनंदप्राप्तीसाठी ईश्वराकडे जायचे आहे’, अशी जाणीव असते, त्यांना ईश्वर प्रकृतीतून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करतो; कारण ईश्वर ‘भक्तवत्सल, कृपाळू आणि प्रीतीस्वरूप’ आहे.
२. जन्म-मूत्यूच्या फेर्यांतून बहुतेक दुःख भोगणार्या जिवांना ‘आता हे चक्र थांबून मला परत जन्म नको’, अशा तीव्र जाणिवेने साधना करावी वाटते. त्यांना ईश्वर गुरूंच्या माध्यमातून साहाय्य करतो.
३. समाजात साधना करणारे जीव अथवा भक्त यांना वाईट प्रवृत्तींच्या लोकांमुळे त्रास भोगावा लागतो, तेव्हा ईश्वर स्वतःहून अवतार म्हणून जन्म घेतो, उदा. श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी किंवा तो अप्रत्यक्षपणे सूक्ष्मातून भक्तांना साहाय्य करतो.
५ आ. ईश्वर साधना न करणार्या जिवांच्या बाबतीत तटस्थ असणे : जे जीव साधना करत नाहीत आणि स्वतःच्या अयोग्य कर्मांमुळे दुःख किंवा यातना भोगतात. त्याविषयी ईश्वर तटस्थ रहातो; परंतु अशा जिवांना दुःख किंवा यातना भोगण्याची शक्ती ‘अनादि शक्ती’ देते.
६. अनादि प्रकृतीने निर्माण केलेली पृथ्वी शुद्ध असून ती आनंद स्वरूपात असते; परंतु मानवाने अधर्माचरण केल्याने तो दुःखी होणे
अनादि प्रकृतीने सृष्टीच्या निर्मितीत शेकडो पृथ्वींची निर्मिती केलेले असते. सर्व पृथ्वी शुद्ध सत्त्वगुणी आणि आनंद स्वरूपात असतात. मनुष्य, प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पृथ्वी आनंददायी असते. ‘पृथ्वीवर सतत आनंदी कसे रहायचे ?’, याचे ज्ञान अनादि प्रकृती मनुष्याला सनातन धर्मातील विविध ग्रंथ आणि ऋषी-मुनींच्या माध्यमातून देते; परंतु मानवाला या सर्वांचे हळूहळू विस्मरण होते. त्याच्याकडून अधर्म होऊ लागतो आणि शेवटी तो दुःखी होतो. साधना करणारे, सदाचरणी किंवा धर्माचरणी जीव ईश्वरी तत्त्वाला अनुसरून आचरण करत असतात. त्यांच्यावर ईश्वराची कृपादृष्टी असते. त्यामुळे तो अशा जिवांना साहाय्य करतो. साधना न करणार्या जिवांना ईश्वराची कृपादृष्टी न लाभल्याने ते रज-तम प्रकृतीच्या आहारी जातात आणि दीर्घकाळ दुःख भोगतात.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२३)
|