भारताचा राष्ट्रध्वज
फडक राष्ट्रध्वजा !
भव्य गगनोदरी ।
सरल उन्नत शिरी ।
धैर्यधृव त्यापरी ।
तळप तेजे तुझ्या ।। – भ. श्री. पंडीत
‘देवाच्या पाषाणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तिच्यात दिव्यत्व निर्माण होते. देवपणा उत्पन्न होतो. लोक तिला भक्तीपूर्वक वंदन करतात. ती फुटली, तर त्यांना वाईट वाटते. कोणी तिच्यावर आघात केला, तर भक्त आघात करणार्याचा घात करण्यासही मागेपुढे पहात नाहीत; कारण निर्जीव पाषाणाला भक्ताच्या भावनेमुळे सजीवत्व प्राप्त झालेले असते. देवकळा प्राप्त झालेली असते. या देवाच्या पाषाणमूर्तीप्रमाणेच राष्ट्रध्वजाच्या आठ, बारा आणे (पूर्वी १६ आण्याचा १ रुपया होत असे) किंमतीच्या कापडात नागरिकांच्या राष्ट्रीय श्रद्धेमुळे राष्ट्रीयत्व निर्माण झालेले असते. राष्ट्रध्वज हा राष्ट्रांतील जनतेचा मानबिंदू असतो. वायूलहरींनी लहरत असलेला उत्तुंग राष्ट्रध्वज पाहून नागरिकांच्या आशा आकांक्षांना बहर येतो. नागरिकांना कार्यस्फूर्ती मिळते. डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज दृष्टीस पडतांच त्याच्याखातर बलिदान करणार्या असंख्य विरांच्या मूर्ती त्यांच्या मनश्चक्षूंपुढे उभ्या रहातात.
कालमानानुसार कल्पना बदलतात. कल्पनांमधे जसजसा बदल होतो, तसतसा राष्ट्रध्वजाच्या स्वरूपामध्येही फरक होतो. शिवकाली आनंदवनभुवन धन्य करणार्या राष्ट्रध्वजाचा भगवा रंग होता. पेशवेकालचा जरिपटक्याने युक्त असलेला ध्वज विक्रमविभव (सामर्थ्यसंपन्नतेचे) द्योतक होता.
आपल्या दुर्दैवाने तद्नंतर भारतात इंग्रजांचे राज्य स्थापन झाले. इंग्रजांच्या युनियन जॅकने दीड-दोनशे वर्षेंपर्यंत भारतात आपले अस्तित्व राखले.
भारतात स्वातंत्र्यसंपादनार्थ पहिला संग्राम झाला, तो वर्ष (इ.स.) १८५७ साली. त्या काळी राष्ट्रध्वजाचा रंग हिरवा आणि सोनेरी होता.
इ.स. १९०६ ते इ.स. १९१५ पर्यंत भारताच्या राष्ट्रध्वजाचा वरचा पट्टा केशरी रंगाचा होता. त्यावर ‘वंदेमातरम्’ हा शब्द लिहिलेला होता. शेवटचा पट्टा हिरवा असून त्यावर सूर्य-चंद्र काढलेले होते.
इ.स. १९१६ ते इ.स. १९२० पर्यंत राष्ट्रध्वजाच्या डाव्या बाजूला काही जागेत युनियन जॅक आणि त्याच्या खाली सप्तर्षींचे चिन्ह होते.
इ.स. १९२० ते इ.स. १९३० पर्यंत भारताचा राष्ट्रध्वज लाल, पांढरा आणि हिरवा असा तीन रंगी होता. पांढर्या पट्ट्यावर भारताच्या ग्रामीण उद्योगधंद्यांचे प्रतीक म्हणून चरख्याचे चित्र काढलेले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचा राष्ट्रध्वज अशोकचक्रांकित आणि तीनरंगी असा निश्चित करण्यात आला. राष्ट्रध्वजातील केशरी वर्ण त्यागाचा निदर्शक आहे, श्वेत-वर्ण सात्त्विकतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे आणि हिरवा वर्ण देशाच्या संपन्नतेचे चिन्ह आहे.
पुष्कळदा असे दिसून येते की, राष्ट्रध्वजाचा जितक्या प्रमाणात मान राखावयास पाहिजे, तितक्या प्रमाणात तो जनता राखत नाही. राष्ट्रीय महोत्सवांच्या वेळीच राष्ट्रध्वज फडकत ठेवणे, तो व्यवस्थित ठेवणे, राष्ट्रगीत चालू असतांना सर्वांनी तद्प्रसंगी उभे राहून शांतता राखणे आणि अशा रितीने राष्ट्रध्वजाविषयी, म्हणजेच पर्यायाने राष्ट्राविषयी आपला आदर व्यक्त करणे, या गोष्टी नागरिकांनी ध्यानांत घेणे अत्यावश्यक आहे. ‘जन गण मन…’ गीत चालू असतां किंवा ‘वंदेमातरम्’ गीत गायिले जात असतां प्रत्येकाने गांभीर्य राखणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्य संपादन ही जितकी महत्त्वाची गोष्ट तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा स्वातंत्र्य चिरस्थायी करणे, ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे. म. गांधींनी आणि इतर अनेक राष्ट्रभक्तांनी स्वतः अनेक खस्ता खाऊन स्वातंत्र्याचा अनमोल ठेवा आपणा भारतियांच्या स्वाधीन करून स्वर्ग गाठलेला आहे. त्यांनी केलेल्या अविश्रांत श्रमाचे आणि त्यांच्या राष्ट्राप्रति असलेल्या श्रद्धेचे सार्थक आपण राष्ट्रीय भावनेचे प्रत्यक्ष प्रतीक जो राष्ट्रध्वज त्याचा मान नि त्याची शान राखण करू या !’
– डॉ. सुहास बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लहान भाऊ)