परशुरामभूमीत अमृत सोहळा !
|
पर्वरी (गोवा) – गोमंतक ही परशुराम भूमी ! देवभूमी ! याच भूमीत रामराज्याचे ध्येय उराशी बाळगणार्या ‘सनातन संस्थे’ने अध्यात्मप्रसाराचे बीज रोवले. आज या पवित्र क्षेत्रीच सनातनचा रौप्य महोत्सव सोहळा, तसेच हिंदु धर्माचे तेजस्वी प्रचारक अन् हिंदूंचे शतकानुशतकांचे स्वप्न असलेल्या श्रीराममंदिराच्या निर्माण कार्यात भरीव योगदान देणारे स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सव सोहळा साकार होणे, हा निवळ योगायोग नाही, तर ही जगंनियंत्या प्रभु श्रीरामाची कृपा आहे आणि एक प्रकारे भविष्यात साकार होणार्या रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची नांदीसुद्धा ! प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव हा संपूर्ण कार्यक्रम आध्यात्मिक स्तरावर पार पडला. स्वामीजींच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण करण्यात आले, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी या प्रसंगी त्यांच्या ब्राह्म आणि क्षात्र तेज युक्त वाणीतून आशीर्वचन दिले. या अमृत क्षणांचे साक्षीदार ठरलेल्यांना या निमित्ताने धर्मपथावर दृढतेने मार्गक्रमण करण्याची प्रेरणा लाभली !
पर्वरीतील सुकुर पंचायत हॉल येथे ३० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या या सोहळ्याच्या प्रसंगी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे मान्यवर उपस्थित होते. यासह या सोहळ्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातनच्या संत पू. दीपाली मतकर, तसेच ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.या सोहळ्याचा आरंभ सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. अमर जोशी यांनी केलेल्या शंखनादाने झाला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तत्पश्चात पुरोहित श्री. अमर जोशी आणि पुरोहित श्री. पवन बर्वे यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर श्री. वीरेंद्र मराठे यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा सन्मान केला. यानंतर गोव्यातील गीता परिवाराच्या वतीने प.पू. स्वामीजींचा सन्मान करण्यात आला. यासह पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे यांनीही प.पू. स्वामीजींचा सन्मान केला. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. वीरेंद्र मराठे यांनी केले. सोहळ्याला एक सहस्र ३०० हून अधिक जणांची उपस्थिती होती.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवी सन्मानाचा भावक्षण !
अयोध्येतील ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष असलेले प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सन्मान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मान पत्र आणि सनातन-निर्मित ग्रंथसंच, असे या सन्मानाचे स्वरूप होते. या मंगल प्रसंगी गोव्यातील गीता परिवाराच्या वतीनेही प.पू. स्वामीजींचा सन्मान करण्यात आला.
क्षणचित्रे !
१. प.पू. स्वामीजींच्या अमृत महोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचे ५ सुवासिनींकडून ७५ दिव्यांनी मंत्रघोषात औक्षण करण्यात आले.
२. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प.पू. स्वामीजींचे स्वागत केले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते.
३. सनातन आश्रमाविषयी सविस्तर माहिती असणार्या व्हिडिओचे लोकार्पण प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प.पू. स्वामीजींनी उत्स्फूर्तपणे ‘सनातन धर्म की जय’, असा उद्घोष केला.
राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वामीजी करत असलेल्या कार्याच्या ठायी सनातन संस्था नतमस्तक !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना अर्पण केले मानपत्र –
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली आहे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
सनातन संस्था काळाच्या प्रवाहाच्या विरोधात कंबर कसून उभी राहिली. २५ वर्षांपूर्वी ‘सनातन’ हा शब्दही उच्चारणे कठीण होते, अशा काळात सनातन संस्थेने व्यापक धर्मकार्य आरंभले. भूमी, परंपरा आणि त्या परंपरा जपणारा समाज, या ३ गोष्टी जेथे असतात, त्याला ‘राष्ट्र’ म्हणतात. हे सत्यात उतरवून दाखवावे लागते. ते सनातनने केले. सनातन संस्थेचे वाढणारे कार्य पहाता, ‘हे कार्य आता थांबणार नाही, ते उत्तरोत्तर वाढतच जाईल आणि एक दिवस हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साकार करेल’, याची ग्वाही मिळते. पूर्वी सनातन हा शब्द उच्चारला जात नव्हता. आता मात्र अगदी राजधानी देहलीत ‘सनातन बोर्ड’ स्थापन करण्याची मागणी होत आहे. हा ‘सनातन’ शब्द गोव्याहून (म्हणजे ‘सनातन संस्था’ या नावामुळे) देहलीत गेला आहे. ही ‘सनातन’ या शब्दाची शक्ती आहे. २५ वर्षांत सनातन संस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली, अनेक संकटे आली. आज सनातनच्या तपाचा (म्हणजे व्यापक धर्मकार्याचा) परिणाम आपल्याला पहायला मिळत आहे. सनातन संस्थेविषयी जेवढे गोडवे गावे, तेवढे थोडेच आहे. सनातन संस्थेचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेले हिंदु राष्ट्राचे ध्येय साकार होण्याची वेळ आली आहे.
कितीही उदात्त विचार असले, तरी शक्ती नसेल, तर ते व्यर्थ आहेत. शक्ती नसेल, तर र्हास होतो. सनातन संस्थेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे सनातनने २५ वर्षांत केवळ धर्माचा प्रचार केला नाही, तर प्रतिकार करणारा समाज निर्माण केला. त्याचे बाळकडू समाजाला पाजले. गोव्याची ‘भोगभूमी’ ही प्रतिमा पालटून ती ‘परशुरामाची भूमी’ असे करण्याचे काम सनातन संस्था, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांचे सरकार यांनी केले आहे.
हा सोहळा समाजाला नवीन दिशा आणि प्रेरणा देणारा ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री, गोवा सरकार
हा सोहळा समाजाला नवीन दिशा आणि प्रेणारा देणारा आहे. प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांच्या कार्यामुळे धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती झाली आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी धर्मरक्षणाच्या कार्यालाही हातभार लावला पाहिजे. गोव्याची ओळख ‘सन, सँड आणि सी’ (सूर्य, वाळू आणि समुद्रकिनारे) अशी होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन खात्याने गोव्याची ही ओळख पालटण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यटन खात्याने ‘एकादश तीर्थ’ योजना कार्यान्वित करून गोव्यात १०० वर्षे जुनी आणि प्रसिद्ध मंदिरे या योजनेच्या अंतर्गत विकसित केली. गोवा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराची पुर्नर्बांधणी केली. आता केंद्राने फर्मागुढी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याच्या ठिकाणी ‘डिजीटल म्युझीयम’ उभारण्यास मान्यता दिली आहे. धर्मरक्षणाच्या कार्याला गोवा सरकारचे सर्व सहकार्य असणार आहे.
सनातन संस्थेच्या कार्यामुळे सहस्रो लोक तणावमुक्त आणि व्यसनमुक्त झाले ! – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक
प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांनी महर्षि वसिष्ठ यांच्याप्रमाणे अखंड असे धर्मरक्षणाचे कार्य केले आहे. महाराजांची साधना आणि धर्मकार्य यांमुळे असंख्य जिवांच्या जीवनात चांगले पालट होऊन ते राष्ट्रभक्त बनले आहेत. सनातन संस्थेने हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे विलक्षण असे कार्य केले आहे. या कार्यामुळे सहस्रो लोक तणावमुक्त आणि व्यसनमुक्त जीवन जगू लागले आहेत.
गोवा सरकार देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
देवाला महत्त्व दिले, तर धर्म जागृत राहील आणि धर्म जागृत राहिला, तर देश जागृत राहील. यासाठी गोवा सरकार देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यासाठी कटीबद्ध आहे. प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांच्यासारख्या अनेक राष्ट्रसंतांमुळे भारतात देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य चालत आहे. गोवा सरकारने मांडवी नदीच्या तिरी भव्य असा भगवान परशुराम यांचा पुतळा उभारून गोव्याची ओळख पुन्हा परशुराम भूमी बनण्यासाठीचे कार्य केले आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा इतिहास संशोधन समितीच्या माध्यमातून सरकारी पातळीवर संग्रहित केला आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची एक प्रतिकृती असलेले मंदिर सरकार उभारून याविषयी जागृती करणार आहे.
सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार !
सनातन संस्थेने कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन आज देशभरात भरीव असे कार्य केले आहे. सनातन संस्थेचा गोव्यातील रामनाथी येथील आश्रमातून हिंदु धर्माचे रक्षणाचे महत्त्वाचे कार्य चालते. सनातन संस्थेचा ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक हिंदूंवर देश आणि विदेशांत होत असलेल्या अत्याचार, तसेच हिंदू करत असलेले चांगले कार्य यांची निरंतर माहिती देऊन हिंदुत्वाच्या जागृतीचे कार्य करत आहे. झोपलेल्या समाजाला किंवा झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला याद्वारे जागृत केले जात आहे.
‘सनातन प्रभात’ हा काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन समाजाच्या उद्धाराकरता कंबर कसून उभा राहिला !प.पू. स्वामीजी यांचे ‘सनातन प्रभात’विषयी कौतुकोद्गार ! या प्रसंगी प.पू. स्वामीजी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी कौतुकोद्गार काढले. ते म्हणाले की, अनुमाने २५ वर्षांपूर्वी माझ्या हातात कुणीतरी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक ठेवला. ‘सनातन प्रभात’चे नाव वाचून माझ्या मनात एकदम पहिला विचार आला की, आता अशा प्रकारची विचारसरणी आणि ‘सनातन प्रभात’ हे नाव किती दिवस टिकणार ? ते टिकावे ही माझी भूमिका, परंतु कुणीतरी काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत जाऊन या समाजाच्या उद्धाराकरता कंबर कसून उभा राहिला आहे, हे बघून माझे अंत:करण आनंदाने भरून आले. |