महाराष्ट्रात ‘झिका’ची एकूण रुग्णसंख्या १४० वर !

रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक !

पुणे – राज्यात ‘झिका’ची रुग्णसंख्या १४० वर पोचली असून त्यात सर्वाधिक १०९ रुग्ण पुणे येथे आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६३ गर्भवती आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचसह ताप रुग्णांच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.

राज्यात पुणे येथे सर्वप्रथम झिकाचा रुग्ण आढळून आला. आतापर्यंत अहिल्यानगर (संगमनेर) येथे ११ रुग्ण, पुणे ग्रामीण १० रुग्ण, पिंपरी-चिंचवड महापालिका ६ रुग्ण आणि सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, दादर (उत्तर) मुंबई येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. पुणे येथे झिकाच्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांचा मृत्यू सहव्याधींमुळे झाल्याचे आरोग्य विभागाच्या मृत्यू परीक्षण समितीने स्पष्ट केले आहे.

झिकाचा प्रसार ‘एडीस इजिप्ती’ डासांमुळे होत असल्याने कीटकनाशक फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. झिकाच्या रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही नगण्य आहे. नागरिकांना ताप आल्यास घाबरून न जाता, आधुनिक वैद्यांना दाखवून वेळीच उपचार घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिला आहे.