प्रभु श्रीरामाचे अलौकिक व्यक्तीमत्त्व !
महर्षि विश्वामित्र श्रीरामाला यज्ञाचे रक्षण करण्यासाठी घेऊन गेले होते; परंतु तेथे त्यांनी श्रीरामाला जीवनाचे शिक्षण दिले. म्हणूनच महर्षि विश्वामित्रांकडून काही तरी शिकलो असल्याची जाणीव श्रीरामाला झाली नाही आणि श्रीरामाला आपण शिक्षण दिले असल्याची जाणीव विश्वामित्राला झाली नाही. प्रभु श्रीराम आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. श्रीरामाला ३ भाऊ होते; परंतु त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. श्रीरामाची मातृ-पितृ भक्ती खरोखरच अनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडिलांची आज्ञा त्याने आनंदाने पाळली. अशा प्रकारची आज्ञा ऐकून श्रीराम जराही व्यथित झाले नाहीत. ज्या कैकयीमातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले. तिच्याविषयीही मनात कोणताही द्वेष न ठेवता श्रीराम तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते. हा प्रसंग श्रीरामाचे व्यक्तीमत्त्व दर्शवतो.
प्रभु श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्रीही आदर्श होती. वालीला मारण्यासाठी श्रीराम सुग्रीवाला, तर रावणाला मारून सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीव श्रीरामाला साहाय्य करतो. ‘मित्र असावा, तर रामासारखा आणि शत्रूही असावा, तर रामासारखा’, असे लोक म्हणत असत. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने अग्निसंस्कार करण्यास नकार दिला होता. ‘मृत्यूबरोबर वैर संपत असते. म्हणून आपल्या भावाला अग्निसंस्कार दे. तू जर हे काम करत नसशील, तर मी करतो. रावण जसा तुझा भाऊ होता, तसा माझाही होता’, असे तेव्हा प्रभु श्रीरामाने बिभीषणाला सांगितले होते.
‘श्रीरामासारखा पती मिळावा’, अशी कामना प्रत्येक स्त्री करत असते. श्रीरामाचे सीतेवर अमर्याद प्रेम होते. प्रभु श्रीरामाचा सीता त्याग आत्मबलीदानाच्या उच्चतम भावाचे प्रतीक आहे. श्रीरामाला आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य श्रीरामाने बिभीषणाला दिले होते; परंतु श्रीरामाला या राज्यांचा मोह झाला नाही.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज