श्री महाकाली होमाचा पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) सकारात्मक परिणाम होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ आणि ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणांद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘महर्षींच्या आज्ञेने १२.९.२०२४ या दिवशी कांचीपुरम् येथील सेवाकेंद्रात श्री महाकाली होम करण्यात आला. हा होम ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावे, साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावे आणि आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे’, या उद्देशाने करण्यात आला. या होमाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची, तसेच सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
‘श्री महाकाली होमाचा होमाचे पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतात ?’, हे अभ्यासण्यासाठी संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ हे उपकरण आणि लोलक यांचा उपयोग करण्यात आला. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक, तसेच नकारात्मक ऊर्जा मोजता येतात.
टीप – ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यासाठी चाचणीस्थळी अधिकाधिक ३० मीटर एवढीच जागा उपलब्ध होती. त्यामुळे अचूक प्रभावळ मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
होमातील ‘श्री महाकाली-श्री महालक्ष्मी- श्री महासरस्वती यंत्रा’मध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या यंत्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १४.५ मीटर आहे.
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. पुरोहितांनी त्यांच्या क्षमतेनुसार होमातील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
२. होमाला उपस्थित साधकांनी त्यांच्या भावानुसार होमातील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
३. संतांमध्ये मुळातच पुष्कळ चैतन्य असते. यामुळे सर्वसाधारण व्यक्ती किंवा साधक यांच्या तुलनेत संतांमध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळते. होमाला उपस्थित तीनही संतांमध्ये होमापूर्वीही शेकडो मीटर सकारात्मक ऊर्जा आढळून आली. संतांनी त्यांच्या कार्यानुरूप होमातील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे होमानंतर संतांमधील सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे दिसून आले.
निष्कर्ष
श्री महाकाली होमाचा पुरोहित आणि होमाला उपस्थित साधक अन् संत यांच्यातील सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) सकारात्मक परिणाम झाले.
महर्षींच्या आज्ञेने केलेल्या होमामागे त्यांचा संकल्प आणि आशीर्वाद कार्यरत असतो. श्री महाकाली होम हा समष्टीच्या कल्याणार्थ करण्यात आला. होमाशी संबंधित सर्व सिद्धता (तयारी) साधकांनी सेवाभावाने केली. या होमाला संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. पुरोहितांनी होम भावपूर्ण केला. यामुळे होमातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. श्री महाकाली होमाची फलनिष्पत्ती उत्तम मिळाली, तसेच तो करण्यामागील उद्देशही सफल झाला. हेच या संशोधनातून दिसून आले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.११.२०२४)
इ-मेल : mav.research2014@gmail.com
|