‘सनातन प्रभात’च्या वाचनाने योग्य आणि मौलिक मार्गदर्शन मिळाले !

काही विशिष्ट ध्येय उराशी बाळगून राष्ट्रहित, समाजहित, भारतीय परंपरा जपणारे, जोपासणारे जे कार्य असते, तेच समाजात उभे रहाते. त्यासाठी कितीही त्रास झाला, आपत्ती आल्या किंवा कष्ट सोसावे लागले, तरी ते कार्य आपल्या पवित्र, सोज्वळ आणि ईश्वरी ध्येयापासून किंचितही मागे न हटता ताठ मानेने उभे रहाते. ‘संकटे आजवर आली, थांबवू न आम्हा शकली ।’ ही पंक्ती गेली दोन तपे कार्य करून ‘सनातन प्रभात’ने सिद्ध केली आहे.

गेली २० वर्षे मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. ‘दासबोध अभ्यास मंडळ मिरज’च्या कार्याच्या निमित्ताने मी दैनिकाच्या संपर्कात आहे. लहानपणीचे आई-वडिलांचे धार्मिक संस्कार, संघाचे संस्कार आणि मोठेपणी दासबोध अभ्यास मंडळ, अन्य समविचारी धार्मिक संस्था यांच्या कार्यात थोडाफार सहभाग असल्याने, तसेच ‘सनातन प्रभात’चे कार्य त्यांना हातभार लावणारे असल्याने याकडे आकृष्ट व्हायला वेळ लागला नाही.

श्री. शाम साखरे

हिंदू जागृत होत असल्याचे परिणाम आता दिसत आहेत !

‘हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध दैनिक’, असे कुणाचीही भीडभाड न ठेवता घोषणा करणारे, धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करतांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व समस्यांना तोंड देऊन हिंदुत्वाचा विचार घराघरांत पोचवण्याचा सनातन प्रभातने निर्धारच केला आहे. सनातन प्रभातच्या वाचनाने योग्य आणि मौलिक मार्गदर्शन मिळालेले आहे. या दैनिकात भारतासह जगामध्ये होणारे अन्याय आणि अत्याचार यांसह हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांची वृत्ते देऊन त्यावरील उपायही सुचवले जातात आणि त्याचमुळे हिंदू जागृत होत असल्याचे परिणाम आता सगळीकडे दिसू लागलेले आहेत.

दैनिकाचे ध्येय साध्य होऊन ‘भारत लवकरच हिंदु राष्ट्र होईल’, असा ठाम विश्वास !

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ इत्यादी अनेक प्रकारच्या जिहाद समवेत मंदिर सरकारीकरण आणि धर्मावर होणार्‍या सर्व प्रकारच्या आघातांना सनातनचे कार्यकर्ते आणि हिंदु धर्माभिमानी करत असलेल्या प्रतिकाराची वृत्ते या दैनिकात दिली जातात. साधकांच्या आणि वाचकांच्या अनुभूती देऊन आध्यात्मिक प्रगतीविषयी मार्गदर्शन केले जाते. या पवित्र धर्मकार्यालाही काही विघ्नसंतोषी मंडळी विरोध करून बाधा आणण्याचा प्रयत्न करतात; पण या ईश्वरी कार्यामागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे अधिष्ठान असल्याने आपले ध्येय साध्य होऊन ‘भारत लवकरच हिंदु राष्ट्र होईल’, असा ठाम विश्वास आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिन: सन्तु । सर्वे सन्तु निरामय ।।’

– श्री. शाम साखरे (वय ८८ वर्षे) अध्यक्ष, दासबोध अभ्यास मंडळ, मिरज.