प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचे कार्य
अ. वेदवाङ्मयाच्या माध्यमातून समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न : वेदवाङ्मय हे सर्वाधिक श्रेष्ठ वाङ्मय आहे. वेदांचे अध्ययन करणे आणि अध्यापन करणे, तसेच त्याचा प्रचार अन् प्रसार करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्वामीजींनी स्वेच्छेने स्वीकारले आहे. आजच्या या विज्ञानाच्या अतीप्रगत युगात मानवसमाज कितीही विकसित आणि आधुनिक झाला, तरी त्याला वेदांमधील ज्ञान संपादन करणे अनिवार्य आहे; कारण वेदविद्या नष्ट झाली, तर हिंदुत्वाचा अस्त होण्यास फारसा वेळ लागणार नाही. वेदांमधील मंत्र आणि ऋचा, म्हणजे आपले राष्ट्र्रगीत आहे. आर्यसमाजाचे पहिले राष्ट्रगीत वेदच आहेत. त्यामुळे ‘वेदविद्या जिवंत ठेवणे, हे आपल्या सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे’, असे वीर सावरकर यांनी आवर्जून सांगितले आहे. (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची सामाजिक भाषणे’, समग्र सावरकर, खंड ९ वा)
वीर सावरकर यांच्या या विचारांना कृतीत उतरवण्याचा शतप्रतिशत यशस्वी प्रयत्न स्वामीजींनी केला आहे. राष्ट्रकार्याला जीवन समर्पित करण्याची प्रेरणा त्यांना सावरकर यांच्या चरित्रातून मिळाली असावी आणि त्यांना लाभलेली अमृतमय वाणी ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपादृष्टी असावी, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत, ‘स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १७, श्लोक १५), म्हणजे ‘वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते.’ भगवान श्रीकृष्णांनी जे उद्बोधन केले, त्याचे अनुसरण करतांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पाऊलखुणा मार्गदर्शक ठरतात, असे स्वामीजींनी त्यांच्या कृतीने दाखवून दिले आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात स्वामीजींचे योगदान वंदनीय आणि अनुकरणीय आहे. राष्ट्र्रनिर्माणाच्या कार्यात जीवन समर्पित करणारे तापसी प्रातःस्मरणीय ठरतात. स्वामीजी अशा तापसींपैकी एक आहेत.
आ. देशाची तरुण पिढी घडवण्यासाठी गुरुकुलाची स्थापना : हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाण्यासाठी वेदपाठशाळेची (गुरुकुलाची) स्थापना करून देशातील विद्यार्थ्यांना वेदामृताची गोडी लावली आहे. या वेदामृताच्या पानाने विद्यार्थीवर्गाला मनःशांती प्राप्त होऊन त्यांच्या मनाचा विकास साधून जीवन घडवण्याचे महान कार्य स्वामीजी करत आहेत. त्यांचे हे कार्य राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
वैदिक आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या बळावर बुद्धी, मन आणि चित्त हे प्रखर, अविचलीत, शुद्ध, पवित्र आणि सात्त्विक होते. संस्कृती आणि धर्म रक्षण करण्याच्या हेतूने मन, बुद्धी अन् चित्त बलिष्ठ असणे नितांत आवश्यक आहे. यामुळे स्वामीजींनी गुरुकुलाची स्थापना केली.
विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्याला ज्ञानाची तृष्णा लागावी, गुरूंवर अढळ-अटळ अशी श्रद्धा निर्माण व्हावी, अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी वर्ग तत्पर झालेला असावा, कोणतेही कार्य करण्यासाठी लागणारी मनाची, चित्ताची आणि बुद्धीची एकाग्रता त्याच्यात निर्माण व्हावी, राष्ट्र्रकार्यासाठी अन् संस्कृती कार्यासाठी जीवन समर्पित करण्याचे ध्येय विद्यार्थीवर्गाने योग्य वयातच आत्मसात करावे, हा प्रधान हेतू या गुरुकुल निर्मितीमागे आहे. स्वामीजी करत असलेले कार्य पाहून अशी नक्की खात्री पटते की, त्यांच्या मनमस्तिष्कावर
केसांनी धरिले समज की येणार ना, संधी ही ।
घाईने कर धर्म शक्य तितुका, हे मानवा प्रत्यही ॥
या श्लोकाचा प्रभाव अधिक असावा. देशातील तरुण-तरुणी आणि विद्यार्थी वर्गावर राष्ट्र्रकार्य करण्याचे संस्कार होणे राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासह विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांत कोणत्याही प्रकारचा वाद असण्याचे कारण नाही. याचे ज्ञान विद्यार्थीवर्गाला देणे नितांत आवश्यक आहे. विष्णुसहस्रनामात म्हटल्याप्रमाणे,
योगो ज्ञानं तथा साङ्ख्यं विद्याः शिल्पादि कर्म च ।
वेदाः शास्त्राणि विज्ञानम् एतत्सर्वं जनार्दनात् ।।
– विष्णुसहस्रनामस्तोत्र, फलश्रुती, श्लोक १९
अर्थ : योग, ज्ञान, सांख्य, विद्या, शिल्प आदी कर्म, वेद, शास्त्र आणि विज्ञान हे सर्व श्रीविष्णूंपासून उत्पन्न झाले आहे. अथर्वशीर्षात गणपति ज्ञानयम आणि विज्ञानयम आहे. तरुण पिढीची अशा प्रकारची जडणघडण व्हावी, या इच्छेनेच स्वामीजी कार्य करत आहेत.
इ. गीता साधना शिबिराचे आयोजन : विविध कार्यासमवेत स्वामीजींच्या वतीने वयस्कर बांधवांसाठीही गीता साधना शिबिराचे आयोजन करण्यात येते.
ई. प्रवचनांच्या माध्यमातून समाजाला धर्मशिक्षित करण्याचे कार्य : स्वामीजी उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांची वाणी प्रासादिक आहे. श्रोते त्यांच्या विचारांनी भारावून जातात आणि त्यांचे मन प्रसन्न होते. स्वामीजी प्रवचन करतांना स्वतःची विद्वत्ता प्रकट करत नाहीत, तर श्रोत्यांच्या मनात भक्तीभाव निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असतो आणि तो ते सहजतेने साध्य करतात. भक्ती प्रेमात रंगून जाणारे स्वामीजी कार्य करतानांही देहभान विसरून जातात. रामायण, महाभारत, भागवत यांसारख्या कथा करतांना त्या कथेतील भावार्थ आणि गर्भित अर्थ सांगता सांगता त्यांच्या विचारमंथनातून वर आलेले तत्त्व सहजतेने सांगून रामायण, महाभारतासारख्या ग्रंथातील कथांचा अन्वयार्थ कसा लावायचा, हेही ते सांगतात. स्वामीजींच्या या प्रवचन शैलीचा दाखला सहज देता येतो. तो असा,
‘दानव आणि दुष्ट यांचा विनाश करणे, हाच राष्ट्रधर्म आहे. त्याचप्रमाणे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना शासन करणे आणि मृत्यूदंड देणे यात राष्ट्र्रहित, तसेच मानवी समाजाचेही हित दडले आहे. आज जगात सर्वत्र मानवाधिकाराचे दडपण वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत कशा प्रकारचा निर्णय घेऊन वर्तन करायचे, याचे मार्गदर्शन श्रीरामांनी आपल्याला केले आहे’, असे सांगून स्वामीजी वालीच्या वधामागचा श्रीरामाचा दृष्टीकोन काय होता, हे विशद करतात. श्रीरामाने आचरलेला मार्ग कोणत्याही परिस्थितीत उचित ठरतो, हे नेमक्या शब्दात स्वामीजींनी सांगितले आहे.
श्रीरामाने झाडाच्या मागे लपून वालीला बाण मारला. वालीला त्याची बाजू मांडण्याची संधीही श्रीरामाने दिली नाही. याप्रसंगी श्रीरामाने केले, ते अत्यंत उचित होते. जेव्हा अपराध घडला, हे निश्चित असते, त्याच्याविषयी शतप्रतिशत खात्री असते आणि त्याचे दाखलेही मिळालेले असतात, अशा वेळी अपराध्याला त्याची बाजू मांडण्याचा अवसर द्यायचा नसतो, तर तेथे त्याच ठिकाणी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करायची असते. आजच्या परिभाषेत त्याला ‘एन्काऊंटर’ असे म्हणतात; कारण अशा परिस्थितीत केवळ तोच एकमात्र पर्याय उपलब्ध असतो.’ अशा प्रकारे स्वामीजी श्रीरामाची रणनीती आणि युद्धनीती श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य करत आहेत. ‘सांप्रत काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे ?’, असा प्रश्न उपस्थित झाला, तर वालीवध आपल्याला मार्गदर्शन करण्यास पर्याप्त आहे, असे स्वामीजी शासनकर्त्यांना सांगू पहातात.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
देशविदेशात निष्काम भावनेने ब्राह्मतेजासह क्षात्रतेजाचा प्रचार
आज केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील सर्व परिस्थिती वेगाने पालटत आहे. दुष्टांच्या दुष्कृत्याला आता सीमा राहिली नाही. अशा परिस्थितीत आपला देश, हिंदु धर्म, संस्कृती आणि आपले अस्तित्व अबाधित रहाण्यासाठी क्षात्रतेजाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन श्रीरामकथा, श्रीकृष्णकथा आणि भागवतकथा यांच्या जोडीने स्वामीजी शिवकथा सांगून ‘ब्राह्मतेजासह क्षात्रतेजाचीही आवश्यकता असते’, असा संदेश देत आहेत. मानवी जीवनाच्या आध्यात्मिक आणि भौतिक अशा २ बाजू आहेत. हे भौतिक जीवन जगत असतांना न्याय, नीती आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती घ्यावे लागते. दुष्टांसाठी सहिष्णुता किंवा अहिंसा उपयुक्त ठरत नाही. हे शिवरायांच्या चरित्रातून सहजपणे कळून येते. त्यामुळेच स्वामीजींनी शिवकथेला धार्मिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी शस्त्रच उपयुक्त ठरते. आपल्या सर्व देवता या शस्त्रधारी आहेत. त्यांनीही त्यांच्या वेळचे राक्षस मारले आहेत. आपल्यालाही धर्मरक्षणार्थ दुष्प्रवृत्तींचे निर्दालन करायचे आहे, जसा छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील परकियांना ठार मारले. हे राष्ट्र्रकार्य धर्मकार्याएवढेच महत्त्वाचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न स्वामीजींनी केला आहे.
स्वामीजी कोणत्याही प्रकारची अभिलाषा मनात न बाळगता धर्मकार्य, संस्कृतीचे कार्य आणि राष्ट्राचे कार्य अव्याहतपणे करत आहेत. त्यांना प्राप्त होणारी दक्षिणाही ते याच कार्यासाठी उपयोगात आणतात.
धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्यासाठी कार्यरत स्वामीजींच्या चरणी मनोभावे वंदन !
गीता सांगते, ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३८) अर्थात् ‘या भूतलावर ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही.’ ज्ञानाची महानता लक्षात घेऊन स्वामीजी अखंड कार्य करत आहेत. त्यांचे जीवनचरित्र विविध गुणांनी संपन्न आहे. आपल्या बांधवांच्या गुणांची प्रशंसा करतांना ते थकत नाहीत. अशा प्रकारे निष्कपट भावाने जीवन जगणारे स्वामीजी स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला प्राधान्य देतात, तसेच स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या ‘मॅन मेकींग रिलीजन’ (माणूस धर्म बनवतो), या विचाराला त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. त्याच विचाराने प्रेरित होऊन स्वामीजी कार्य करत आहेत. धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्यासाठी कार्य करणार्या स्वामींना पुन्हा एकदा मनोभावे वंदन !’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर (१३.११.२०२४)