ज्ञानी, तपस्वी आणि कर्मयोगी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि !
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असणारे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि !
‘ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या जीवनात आपल्याला सहजतेने आढळून येतो. ते त्यांच्या अमृतमय वाणीने श्रोत्यांच्या मनमस्तिष्कावर संस्कारांचा अभिषेक अविरत करत आहेत. संन्यस्त वृत्ती धारण करून समाजात वावरणार्या आणि अखंड ज्ञानयज्ञ करणार्या स्वामीजींना प्रारंभीच विनम्र प्रणिपात करतो. स्वामीजींनी देव, देश आणि धर्म कार्य यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. आपल्या संस्कृतीने सांगितलेल्या अष्टांग मार्गावरून त्यांची वाटचाल अथकपणे चालू आहे. किंबहुना त्यांचा तसा संकल्पच आहे. संस्कृतीने सांगितलेला अष्टांग मार्ग…
इज्याऽध्ययनदानानि तप: सत्यं क्षमा शम: ।
अलोभ इति मार्गोऽयं धर्मस्याष्टविध: स्मृत: ॥
अर्थात् यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्य, क्षमा, शांती, निर्लोभ वृत्ती हाच धर्माने सांगितलेला अष्टांग मार्ग आहे. आपल्या विविध ग्रंथांतून स्वाध्याय यज्ञ, दान यज्ञ, तप यज्ञ, ज्ञान यज्ञ आदी विविध प्रकारच्या यज्ञांचा उल्लेख आढळतो. स्वामीजींनी अशा प्रकारच्या विविध यज्ञांचा आरंभ केला, ज्याला अनेक दशके लोटली. ते अशा प्रकारच्या राष्ट्रीय यज्ञात आजही व्यस्त असतात.
‘हे संपूर्ण विश्व आर्यमय करायचे आहे’, असे ध्येय आपल्या वेदांनी हिंदु समाजासमोर ठेवले आहे. ‘विश्व आर्यमय करायचे’, याचा अर्थ विश्वातील अखिल मानवी समाज सुशिक्षित, सुविद्य आणि सुसंस्कृत करण्याची शपथ घेणे, असा आहे. या शपथेची पूर्ती करण्यासाठी मायभूमीसह विदेशातही त्यांचा ज्ञानयज्ञ आणि राष्ट्रयज्ञ अखंड चालू आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥’, हा संत नामदेव महाराजांचा संकल्प त्यांचा वारसा सांगणार्या प्रत्येकाचा संकल्प आहे. तो आपण प्राणपणाने पूर्ण केला पाहिजे’, असे स्वामीजी त्यांच्या कृतीने सांगतात.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.
वात्सल्यभावाने ओतप्रत असलेल्या स्वामीजींकडे अयोध्येतील श्रीराममंदिराच्या कोषाध्यक्षपदाचे दायित्व
हिंदूंनी उभारलेले प्रत्येक मंदिर, म्हणजे हिंदु संस्कृतीचे केंद्र आहे. श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्येत श्रीराममंदिर पुनश्च उभारण्यात आले. ५ शतकांनंतर आपल्याला न्याय मिळाला, त्याचा सर्वांनाच आनंद झाला. आता त्या पवित्र क्षेत्री श्रीरामांचे आगमन झाले असून रामभक्तांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्या श्रीरामांच्या मंदिराचे कोषाध्यक्ष म्हणून स्वामीजींनी दायित्व स्वीकारले आहे.
श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्या वेळी पंतप्रधानांनी ११ दिवसांचे व्रत पाळले. श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ११ दिवसांचा उपवास सोडायचा होता. स्वामीजी पंतप्रधानांना श्रीरामाचे चरणतीर्थ देण्यासाठी गेले, त्या वेळी पंतप्रधानांनी त्यांना श्रीरामाचे चरणामृत पाजण्याची विनंती केली. त्यांची ती विनंती मान्य करून श्रीरामाचे चरणतीर्थ पंतप्रधानांना पाजले. त्या वेळी त्यांच्या मनात वात्सल्यभाव जागृत झाला आणि त्यांचा कंठ दाटून आला. स्वामीजींची ही भावूकता आणि त्यांच्या मनाची कोमलता त्यांच्या ज्ञानाच्या कर्माच्या आड आली नाही. एवढेच नव्हे, तर संन्याशी असूनही अशा प्रकारचा वात्सल्यभाव स्वामीजींच्या ठायी जतन आहे. त्या वेळी ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे खरे भक्त असल्याची साक्ष पटते. भक्ताविषयी भगवंताच्या आणि संतपुरुषांच्या अंत:करणात वात्सल्यभाव असतो. भगवंताची उपासना करतांना आणि संतांप्रमाणे नम्रतेने, निरलस निरपेक्षभावाने कार्य करतांना त्यांच्यातील गुण उचलायचे असतात, तरच आपण त्यांचे भक्त होण्यास पात्र ठरतो. ही आपल्या संस्कृतीची शिकवण स्वामींनी तंतोतंत आपल्या आचरणात आणल्याचे सर्व जगाने पाहिले. वात्सल्य भावनेने ओतप्रोत भरलेले अंत:करण असलेले कोषाध्यक्ष स्वामीजींच्या रूपात श्रीराममंदिराला लाभले, ही प्रभु श्रीरामाचीच कृपा आहे. ही श्रीरामाची इच्छा आहे, यात संशय नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर