सनातन संस्थेची २५ वर्षे आणि समाज !

समाजामध्ये अनेक संस्था, अनेक संघटना असतात. त्यांचे विविधरूपी परिणाम समाजावर होत असतात. प्रत्येक व्यक्तीवरही ते होत रहातात. सनातन संस्था स्थापन झाल्यापासून या संस्थेचा रोख व्यक्ती घडवण्याकडे आहे. आपला देश, समाज यांना योग्य दिशा देत संस्थेचा संदेश अखिल मानव जातीपर्यंत पोचवणे, त्या अनुषंगाने संपूर्ण मानव जातीचा उद्धार करणे, हे संस्थेचे गेल्या २५ वर्षांपासूनचे स्वप्न आहे. समाजातील काही घटकांचा विरोध, तर काहींचा पाठिंबा घेत संस्थेचे कार्य पुढे जात आहे. विरोध सहन करत आणि त्याला न डगमगता स्वतःच्या ईश्‍वरी कार्यावर श्रद्धा ठेवत साधकांनी कार्याची पणती तेवत ठेवलेली आहे. एक प्रकारे घरच्या माणसांचा विरोध सहन करत मार्गक्रमण करणार्‍या संस्थेने विरोधाची किती आग सहन केली असेल, याचा अंदाज वाचकाला येऊ शकेल.

१. हिंदु राष्ट्रासाठी देशात सकारात्मक वातावरण निर्माण करणारी सनातन संस्था !

१ अ. प्रारंभी अशक्य वाटणार्‍या घटना साधक घडण्याची प्रक्रिया पाहून शक्य आहेत, असे वाटणे : संस्थेच्या प्रारंभीच्या काळात ईश्‍वरी राज्य, म्हणजे हिंदु राष्ट्राची संकल्पना म्हणा किंवा भारताला ‘जगामध्ये सर्वश्रेष्ठ राष्ट्र’ बनवण्याचे संस्थेचे ध्येय, या सगळ्या घटना अशक्यप्राय वाटायच्या. स्वतःचे कर्तृत्व, स्वाभिमान, हिंदु धर्मविषयक एकदम खालावलेली मनाची पातळी, अशा वाईट परिस्थितीत रुजलेला त्या वेळचा आपला समाज होता. अशा वाईट अवस्थेतून बाहेर येऊन हा आपला देश जगात सर्वश्रेष्ठ होण्याची स्वप्ने त्याकाळी हास्यास्पद वाटायची; परंतु पुढे हळूहळू साधनेच्या मार्गाने पुढे जात, साधक घडण्याची आणि घडवण्याची प्रक्रिया सर्वसामान्यांच्या लक्षात येत राहिली. याच मार्गात पुढे गेल्यास आधी आपला सभोवतालचा परिसर, पुढे आपले गोवा राज्य आणि त्यापुढे भारत देश या प्रक्रियेत समाविष्ट झाल्यास हे अशक्यप्राय कार्य शक्य व्हायची धूसर आशा मनाला वाटायला लागली.

१ आ. देशात हिंदु धर्मविषयक होणारे पालट, हे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पायर्‍याच ! : आपले द्रष्टे साधूसंत म्हणा किंवा ऋषिमुनी किंवा आजच्या काळातले त्याच्याच तोडीचे आपले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विचारांचा आणि सर्वसामान्य जनतेच्या विचारांचा आवाका यांतील भेद माझ्यासारख्या अल्पबुद्धी साधकाला कळायला लागला, तसतसा आपल्या ज्येष्ठ साधू-संतांच्या भविष्यवाणीचा प्रत्यय येत राहिला. अशक्यप्राय वाटणार्‍या श्रीराममंदिराच्या उभारणीची घटना आणि त्या अनुषंगाने गेल्या १० वर्षांपासून देशांतर्गत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने होणारे सकारात्मक पालट किंवा देशातील जनतेच्या मनात हिंदु धर्मविषयक होणारे पालट, हे सगळे टप्पे हिंदु राष्ट्र संकल्पनेच्या दिशेच्या पायर्‍याच आहेत. ही सकारात्मक जाणीव मनाला वेगळी अनुभूती देत होती. सनातन संस्थेचे वाढत जाणारे कार्य, तसेच प्रत्येक साधकाच्या धाडसाच्या जोरावर आणि तमाम साधूसंतांच्या पुण्याईने भरलेल्या इच्छाशक्तीच्या आधारे आगामी ५ ते १० वर्षांच्या काळात हिंदु राष्ट्राची प्रत्यक्ष स्थापनेची वेळ येऊ शकते, असे आज देशात सकारात्मक वातावरण निर्माण झालेले दिसत आहे.

२. अनेक व्यक्तीमत्त्वांचे आयुष्य कृतकृत्य करणारी सनातन संस्था !

सर्वसामान्य माणसे घडवण्यापासून सनातन संस्थेने चालू केलेली प्रक्रिया आज आपले राष्ट्र हिंदु राष्ट्रामध्ये अवतीर्ण करायचा पूर्वापार मानस या दोन्ही गोष्टी जरी भिन्न वाटत असल्या, तरी त्या श्रीराममंदिराच्या आधारे भविष्यात प्रत्यक्ष येणार्‍या रामराज्याच्या राज्यव्यवस्थेला चालना देणार्‍या आहेत, समांतर अशा आहेत; म्हणूनच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीला दिलेले हे वळण म्हणा किंवा दिलेली दिशा, ही केवळ अद्भुत अशा विशेषणांनी वर्णन करण्यासारखी वाटते. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाला या कार्याची महती समजून घ्यायला २५ वर्षांचा कालावधी जावा लागला. संस्थेचे कार्य, तसेच तिच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याला सतत स्वतः होऊन पाठिंबा देणारा मी एक लहान लेखक आहे; परंतु त्या छोट्याशा कार्यातून मिळणारे समाधान किंवा आनंद, त्यामुळे माझी आध्यात्मिक आणि साहित्यिक या दृष्टीने झालेली वाढ मी अनुभवतो आहे. आयुष्याचा हा २५ वर्षांचा टप्पा लाखमोलाचा बनवण्याचे पुण्य मला संस्थेशी निगडित ठरलेल्या कार्याने आजवर दिले आहे. माझ्यासारखीच अशी अनेक व्यक्तीमत्त्वे येथेे आहेत, ज्यांचे आयुष्य सनातनने सांगितलेल्या साधनेच्या आधारे कृतकृत्य झालेले आहे. समाजातील घटकांच्या आयुष्याला योग्य प्रकारची दिशा देत त्यांच्याकडून समाजोन्नतीचे पुण्यवान कार्य घडवून आणण्याचे एक प्रकारे दायित्वच परात्पर गुरु डॉक्टरांनी घेतलेले आहे; म्हणून त्यांचे सनातन संस्थेच्या माध्यमातून चालू असलेले कार्य आजवर एकमेवाद्वितीय असे ठरलेले आहे.

३. आगामी काळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्पाची पूर्तता होणारा !

श्री. महेश पारकर

हिंदु राष्ट्राची अधिकृत घोषणा ही राजकीय पातळीवरून होणार कि सनातन संस्थेच्या पुढाकाराने चाललेले साधक, तसेच साधूसंत यांच्या समन्वयाद्वारे होणार ?, हे सूत्र एक प्रकारे गौण असले, तरी जगात समस्त हिंदूंना हक्काचे स्वस्थान देण्याच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या पूर्वजांनी चिरंतन बाळगलेली ही अभिलाषा असून तिला मूर्तरूप येईस्तोवर आपले साधक गप्प बसणार नाहीत, हेसुद्धा तितकेच खरे आहे; परंतु मुख्य सूत्र आहे ते म्हणजे तो दिवस उजाडेस्तोवर रामराज्याच्या राज्यव्यवस्थेत समरस होणारी मानसिकता आम्हा भारतियांची होणार कि हिंदु राष्ट्राची अधिकृत घोषणा झाल्यानंतर रामराज्याला अपेक्षित अशी जनतेची दिनचर्या बनणार ?

खरे म्हणजे आगामी काळात सनातन संस्थेच्या देशव्यापी कार्यात कशी आणि किती वाढ होते ? यावर सर्व अवलंबून आहे. त्या दृष्टीने विचार करता आगामी काळ हा संस्थेची कसोटी बघणारा, तितकाच आव्हानांनी भरलेला असेल, यात तीळमात्र शंका नाही. स्वतः परात्पर गुरु डॉक्टरांनी जी आयुष्यभर स्वप्ने पाहिली, त्यांची पूर्तता करणारा येणारा काळ असणार आहे.

४. सनातन संस्थेला २५ वर्षांच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

श्रीकृष्णाचे मथुरेचे जन्मस्थान मुक्त करणारा हा काळ आहे. याखेरीज पाकव्याप्त काश्मीर मुक्त होऊन खंडित भारतभूमीची व्याप्ती पुन्हा अखंड करण्याच्या दृष्टीने भारतियांना प्रेरित करणारा आगामी कालखंड असणार आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने, तसेच जगात देशाची प्रतिमा अधिक उजळ करण्याच्या दृष्टीने आगामी काळ तितकाच महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने भारतियांचे वैचारिक सामर्थ्य जगाला पटवण्याच्या अनुषंगाने सनातन संस्थेचे योगदान लक्षणीय ठरणार आहे. त्यासाठी सनातन संस्थेला २५ वर्षांच्या टप्प्यावर मनःपूर्वक शुभेच्छा !

– श्री. महेश पारकर, कोकण आणि मराठी साहित्यिक, गोवा.