दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : सांगली येथील मार्केट यार्ड बँक चोरीप्रकरणी गुन्हेगाराला अटक !….‘वक्फ बोर्डा’ने केलेल्या भूमीसंपादनाच्या विरोधात बेळगाव येथे १ डिसेंबरला आंदोलन !…..
सांगली येथील मार्केट यार्ड बँक चोरीप्रकरणी गुन्हेगाराला अटक !
सांगली, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरातील मार्केट यार्ड परिसरातील ‘तासगाव अर्बन बँके’च्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणार्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार विशाल साळुंखे, असे आरोपीचे नाव आहे. या घटनेतील २ संशयित आरोपी सुदर्शन यादव आणि मुनीब उपाख्य बाबू भाटकर पसार झाले आहेत. या ३ आरोपींनी २ दिवसांपूर्वी तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत पैसे आदान-प्रदान करण्याच्या खोलीत (कॅशियर रूम) चोरीचा प्रयत्न केला होता.
‘वक्फ बोर्डा’ने केलेल्या भूमीसंपादनाच्या विरोधात बेळगाव येथे १ डिसेंबरला आंदोलन !
बेळगाव – ‘वक्फ बोर्डा’ने केलेल्या भूमीसंपादनाच्या विरोधात भाजप कर्नाटक राज्यात लढा देत असून या अंतर्गत १ डिसेंबरला बेळगाव येथे जनजागृती आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन गांधी भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. तरी मोठ्या संख्येने हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन रमेश जारकीहोळी यांनी केले. ते या संदर्भात आयोजित एक बैठकीत बोलत होते. या वेळी किरण जाधव, मुरुगेंद्रगौडा पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
पुणे येथे ३२ बोअर आणि २० काडतुसे यांची चोरी !
पुणे – परवानाधारक बंदूक विक्रीच्या दुकानातून ३२ बोअर आणि पिस्तुलाची २० काडतुसे चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अदित्य मॅकनोर आणि सुमीत कांबळे यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. याविषयी अजान बंदूकवाला यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. जलद पैसे कमावण्यासाठी अदित्यने चोरी केली. सुमीतच्या साहाय्याने काडतुसे विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली.
कालवा समिती नसल्यामुळे पाण्याचा निर्णय लांबणीवर !
पुणे – शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमध्ये सध्या पुरेसे पाणी उपलब्ध असले, तरीही शहरासाठी किती पाणी राखीव ठेवले जाईल ? या संदर्भातील जलसंपदा विभागाचा निर्णय अद्याप झाला नाही. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कालवा समितीच्या बैठकीत याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. महापालिकेच्या नियोजनानुसार शहराला २१ टी.एम्.सी. पाण्याची आवश्यकता असते. कालवा सल्लागार समितीची बैठकही घेण्यात येते. शहराला पाणी देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने दिला आहे. राज्य सरकारच्या संमती नंतरच त्याचा निर्णय होईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.