पुणे शहरातील पराभूत उमेदवार ‘इ.व्ही.एम्.’च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाणार !
‘व्हीव्हीपॅट’मधील मतांच्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी
पुणे – विधानसभा निवडणुकीमध्ये ‘महाविकास’ आघाडीला अपयश आले. येथील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’मध्ये (‘इ.व्ही.एम्.’मध्ये) घोटाळा झाल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ‘व्हीव्हीपॅट’मधील मतांच्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणीही त्यांनी केली असून त्यासाठीचे शुल्क निवडणूक आयोगाकडे भरण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी दिली. या वेळी पुण्यातील विधानसभा मतदारसंघांतील पराभूत झालेले सर्व उमेदवार उपस्थित होते.
इस्रायली आस्थापनाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून मतदान यंत्रात पालट करण्यात आला. यामध्ये ‘महायुती’च्या उमेदवारांच्या मतदानात १५ ते २० टक्के वाढ करण्यात आली असल्याचा दावा जगताप यांनी केला. ‘‘इ.व्ही.एम्.’मध्ये ३ युनिट असतात. मतदान यंत्र केंद्रात येईपर्यंत एकदा इंटरनेटशी जोडून चिन्ह जोडले जाते. मतपत्रिकेमध्ये पारदर्शकता होती. ‘इ.व्ही.एम्.’मध्ये २० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंतच्या एका दिवसाच्या प्रणालीत आधीच पालट (फेरफार) केला होता. त्यामुळे ‘महायुती’च्या उमेदवारांना अधिक मते मिळाल्याचा आरोप जगताप यांनी केला. तसेच त्यांनी या वेळी ‘इ.व्ही.एम्.’ हॅकिंगविषयीही सांगितले.